शेतकऱ्याचे मोठे नुकसान, खुलताबाद शिवारातील घटना
खुलताबाद : दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे म्हैसमाळ रस्त्यावरील एका शेतकऱ्याचे सौरऊर्जा कृषिपंप उडून विहिरीत पडल्याने त्याचे मोठे नुकसान झाले आहे.
खुलताबाद शिवारातील म्हैसमाळ रस्त्यावरील सर्व्हे नंबर ४२/१ मध्ये नरेंद्रसिंग सांळुके यांची शेती असून, वर्षभरापूर्वी त्यांनी विहीर घेतली. विहिरीसाठी त्यांना वीज जोडणी लागत असल्याने त्यांनी महावितरण कंपनीकडे रोटेशन भरले. परंतु महावितरण कंपनीने सांळुके यांना शासनाच्या सोलार कृषिपंप योजनेतून मुद्रा सौर कृषिपंप बसवून दिला. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे त्यांच्या विहिरीवरील सौरऊर्जा कृषिपंपाचे सोलारसहीत सर्व साहित्य उडून विहिरीत पडल्याने मोठे नुकसान झाले. क्रेनच्या सहाय्याने विहिरीत पडलेले साहित्य बाहेर काढण्यात आले. कंपनीने पंचनामा करून दुसरा सौरऊर्जा कृषिपंप बसवून देण्याची मागणी नरेंद्रसिंग साळुंके यांनी केली.
फोटो : नरेंद्रसिंग सांळुके यांच्या विहिरीवरील सौरऊर्जा कृषिपंप वादळी वाऱ्यामुळे विहिरीत पडून मोठे नुकसान झाले आहे.