वाळूज महानगर : वाळूज येथील विद्युत पंपाची दुरुस्ती करण्यात आल्यानंतर पंधरा दिवसांनंतर सोमवारी गावातील पाणी पुरवठा सुरळीत झाला आहे. मात्र, नियोजन कोलमडल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
वाळूज गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरीवरुन विद्युत पंप पंधरा दिवसापुर्वी नादूरुस्त झाला होता. त्यामुळे अविनाश कॉलनी, समता कॉलनी, दत्त कॉलनी, शिवाजीनगर व नवीन वसाहतीतील पाणी पुरवठा बंद झाला होता. त्यामुळे नागरिकांना जारचे विकत पाणी घ्यावे लागत होते. वापरासाठी पाणी नसल्यामुळे या भागातील नागरिकांनी वर्गणी गोळा करुन टँकरने विकत पाणी घेतले. ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्यात एमआयडीसी प्रशासनाकडून यापूर्वीच जवळपास ५० टक्के कपात करण्यात आल्याने गावातील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे.
दरम्यान, नादुरुस्त झालेल्या विद्युत पंप दुरुस्त करण्यासाठी जवळपास पंधरा दिवसांचा कालावधी लागला. गरवारे उद्योग समुहाकडे दररोज जवळपास ५० हजार लिटर पाण्याचा पुरवठा केला जात असल्यामुळे पाण्यासाठी होणारी भटकंती काही प्रमाणात थांबली आहे. पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक सतत कोलमडत असल्यामुळे नागरिकांच्या रोषाला ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.
एमआयडीसीच्या पाणी पुरवठ्यात कपात झाल्यामुळेच गावातील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याचा दावा ग्रामपंचायतीचे पदाधिकारी करीत आहे. नियोजनाभआवी गावात भीषण पाणी टंचाईचे संकट निर्माण झाल्याचे नामदेव इले, शेख युसुफ व त्रस्त नागरिकांचे म्हणणे आहे.