औरंगाबाद : कमीत कमी जागेत जास्तीत-जास्त झाडांची लागवड करून घनदाट जंगल निर्माण करण्याचा जपानमध्ये ‘मियावाकी घनवन प्रकल्प’ यशस्वी झाला आहे. हा प्रकल्प डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उभारण्यात येणार असून, अवघ्या अर्धा एकर जागेत तब्बल पाच हजार झाडांची याअंतर्गत लागवड करण्यात येणार आहे. विद्यापीठात वनस्पतीशास्त्र विभागाकडे जाताना डाव्या बाजूला व संशोधक विद्यार्थी वसतिगृहाजवळील नाल्यालगत अर्धा एकर जागेवर विविध प्रकारची ५ हजार झाडे लावण्यात येणार आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून मे पर्यंत हा प्रकल्प साकारला जाणार आहे. या प्रकल्पात ‘इकोसत्त्व एन्हायर्नमेंट सोल्युशन्स’ ही संस्था मदत करीत आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते गुरुवारी झाले. यावेळी कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, ‘इकोसत्त्व’च्या संचालक नताशा झरीन, रासेयो संचालक डॉ. टी.आर. पाटील, कार्यकारी अभियंता रवींद्र काळे, उद्यान अधीक्षक डॉ. गोविंद हुंबे, भारत अभियानच्या प्रकल्प अधिकारी आम्रपाली त्रिभुवन, प्रकल्प व्यवस्थापक सिद्धार्थ इंगळे, प्रेम राजपूत आदींची उपस्थिती होती.
या प्रकल्पाबद्दल रासेयो संचालक डॉ. टी. आर. पाटील म्हणाले की, जपानमधील वनस्पतीशास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांची ही मूळ संकल्पना आहे. केवळ स्थानिक प्रजातींचा वापर करून रोपांची दाट लागवड केली जाते. रोपे निवडतानाही दुर्मीळ प्रजातींना प्राधान्य देण्यात येते. ज्या मातीची प्रत प्राधान्याने खराब असते, अशा चार स्तरांमध्ये एक ते बारा महिने वयाची रोपे या पद्धतीत लावण्यात येतात. यातून विविध प्रजातींच्या वृक्षांचे जंगल तयार केले जाते. मृदा सर्वेक्षण, प्रजातींची निवड आणि वर्गीकरण, बायोमास सर्वेक्षण, वृक्षारोपण आणि देखभाल असे विविध टप्पे मियावाकी पद्धतीत पार पाडावे लागतात. कोंडा, शेणखत, तणस, जीवामृत, बांबू काठ्या, गूळ, शेण, बेसन आणि गोमूत्र यांचा वापरही माती आणि रोपांच्या संवर्धनासाठी केला जातो.
चौकट......
तीन वर्षांनंतर खर्च करावा लागणार नाही
मियावाकी पद्धतीत समाजाचा सहभाग घेऊन वृक्षारोपण केले जाते. रोपे लावल्यानंतर दहा वर्षांच्या कालावधीत दाट जंगल तयार होण्यास सुरुवात होते. एका एकरात सुमारे १२ हजार झाडे विकसित केली जाऊ शकतात. एक ते तीन वर्षांनंतर या झाडांकरिता कोणताही खर्च करावा लागत नाही.