औरंगाबाद : विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी अनेकांच्या डोक्यातील अंधश्रद्धेचे भूत उतरायला तयार नाही. शिक्षित, सुशिक्षित, उच्चशिक्षित आणि अतिउच्चशिक्षितही या अंधश्रद्धेला सहज बळी पडतात आणि गंडवले जातात. मध्यंतरी बुवा आणि बाबांचे अमाप पीक आले होते. अशा बाबा आणि बुवांवर व मांत्रिकांना आळा बसावा यासाठी नरेंद्र दाभोलकर यांना मोठा संघर्ष करावा लागला आणि प्रतिगाम्यांच्या गोळीला बळी पडून शहीद व्हावे लागले.
- २०१३ मध्ये कायदा झाला...
२६ ऑगस्ट २०१३ पासून महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अमलात आला. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायदा-२०१३, असे या कायद्याचे नाव आहे. या कायद्यांतर्गत गुन्हा सिद्ध झाल्यास तीन ते सात वर्षांची शिक्षा होऊ शकते.
- आठ वर्षांत साधारणपणे २० ते २५ गुन्हे दाखल...
अंधश्रद्धा निर्मूलन कायदा झाल्यापासून महाराष्ट्रात आतापर्यंत सहाशेच्या वर गुन्हे दाखल झाले आहेत, तर एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात २० ते २५ गुन्हे दाखल झाले आहेत.
.......
कायद्याची कडक अंमलबजावणी होत नाही...
कुठल्याही कायद्याचे यश हे त्याच्या कडक अंमलबजावणीवर अवलंबून असते. याही कायद्याचे तेच आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शासनाबरोबर काम करायला तयार आहे. आमच्याकडे डॉ. रश्मी बोरीकर, भाऊसाहेब पठाडे, मोहन भोमे, सुनील चोथमल, अनिल खोजरे, प्रशांत कांबळे, अतुल बडवे, दीपक खंडागळे, अशी टीम आहे. शिवाय रामभाऊ निकाळजे, विश्वनाथ जांभळे, एम. लाल आदीही अंधश्रद्धा निमूर्लनाचे कार्य करीत जनजागृती करीत आहेत. ते गावागावांत जाऊन प्रबोधन करायला तयार आहेत. शासनाने स्थापन केलेली एक समिती अद्याप तरी कागदावरच आहे. या समितीत श्याम मानव व अविनाश पाटील यांच्यासारखी जाणकार मंडळी काम करीत होती. आता या समितीचे पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे. दुसरे म्हणजे गुन्हे दाखल करताना या कायद्याबद्दल पोलिसांचे असलेले अज्ञान. ते दूर होण्यासाठी त्यांना कायद्याचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
-शहाजी भोसले, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
...............................................................................................
भानामती कसली, हे तर खेळ विज्ञानाचे...
१) औरंगाबादेत अगदी अलीकडे वशीकरण, मूठ करणी, संतान समस्या, सासू-सुना भांडण, यावर उपाय करण्याच्या नावाखाली पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्या तंत्रमंत्र सम्राटावर क्रांती चौक पोलिसांनी कारवाई केली. हा बाबा अशी जाहिरात करून लोकांना लुबाडत होता. २५० रु. फी घेत होता. त्याच्याकडील जादूटोण्याचे साहित्य जप्त करून पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या कलम ३ (२) (३) अन्वये गुन्हा दाखल केला.
२) फुलंब्रीजवळची एक घटना ताजी आहे. तुमच्या नशिबात गुप्तधन आहे. ते काढण्यासाठी मुलीचा बळी द्यावा लागेल, असे सांगून तशी तयारी सुरू करण्यात आली होती; परंतु अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना याची खबर मिळाली आणि ते पोलिसांसह तेथे पोहोचले. दगड, माती, कोळसा भरून ठेवलेला एक हंडा पोलिसांनी जप्त केला आणि बळी देण्यासाठी आणलेल्या मुलीची सुटका करण्यात आली.