--
औरंगाबाद : येथील सिडको एन-६, संभाजी कॉलनी येथील कंपनी कामगाराच्या मुलाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवत शहराची मान उंचावली. आयआयटी पाटणा येथून मेकॅनिकल अभियंत्याची पदवी घेतलेल्या अनिकेत लक्ष्मीकांत कुलकर्णीने या परीक्षेत ५१७ वे स्थान पटकावले.
अनिकेतचे प्राथमिक शिक्षण ओम प्राथमिक प्रशालेत, तर माध्यमिक शिक्षण धर्मवीर संभाजी विद्यालयात घेतले. अकरावी-बारावी सरस्वती भुवन महाविद्यालयातून पूर्ण करून आयआयटी पाटणा येथे त्याचा नंबर लागला. तेथे बीटेक पदवीचे शिक्षण पूर्ण केले. बी.टेक.चे शिक्षण घेतानाच लोकसेवक होण्याची त्याची इच्छा होती. त्या दृष्टीने तयारी सुरू केली. खूप अभ्यास केला. पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नाही तरी हरलो नाही. घरीच सेल्फ स्टडी करीत राहिलो. २०२० च्या यूपीएससी परीक्षेत यश मिळाले. ऑल इंडिया रँक ५१७ आल्याने आयपीएस किंवा आयआरएस सेवा मिळेल. डिसेंबरमध्ये ट्रेनिंग सुरू होईल.
आयपीएस मिळावे अशी इच्छा आहे; परंतु कोणतेही क्षेत्र मिळाले तरी लोकसेवक म्हणून लोकांसाठी काम करता येतील, याचा आनंद आहे. ज्यासाठी ही मेहनत केली होती, ते साध्य झाल्याचा आनंद माझ्यापेक्षा कुटुंबीयांना अधिक आहे. वडील कंपनीत नोकरी करीत असून आई गृहिणी आहे. भाऊ नुकताच बँकेत नोकरीला लागला आहे. त्यांचा भक्कम पाठिंबा आणि दिलेले प्रोत्साहन यांमुळे यश मिळाले. शुक्रवारी प्रत्यक्ष निकाल हाती आल्यावर आनंद गगनात मावेनासा झाला. शहरवासीयांकडूनही कौतुकाचा वर्षाव होत असल्याने भारावून गेल्याची भावना अनिकेतने ‘लोकमत’कडे बोलून दाखवली.
---
सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव
या यशाबद्दल शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, राजू वैद्य, विरू गादगे, मकरंद कुलकर्णी, अनिल जैस्वाल, मंगेश भाले, हुशारसिंह चव्हाण, प्राजक्ता भाले, सीमा गवळी, चंद्रकांत गवई, सोपान बांगर, रघुनाथ शिंदे, मधुकर वाघमारे, रवी देशमुख, पंकज पाषाण, विजयसिंह राजपूत, चंद्रकांत देवराज, किशोर शेळके, चेतन सिंगरे, अरुण गव्हाड, बद्रीनाथ ठोंबरे, सागर कुलकर्णी, विश्वंभर कुलकर्णी, महेश दोरवट, राजू जहागीरदार, प्राचार्य भोईर, नातेवाइकांसह परिसरातील मित्र, नागरिकांनी अनिकेत यांचा सत्कार केला.