वीरगाव ( जि. औरंगाबाद ) : वैजापूर तालुक्यातील गोयगाव परिसरातील कागोणी शिवारात घरगुती वादातून मुलाने गळफास घेतला, तर दुसऱ्या दिवशी बापाने विषारी औषध पिऊन विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. बुधवारी आणि गुरुवारी रात्री या घटना घडल्या असून यात सुरेश कैलास मोटे (२२) व कैलास अप्पासाहेब मोटे (५५) या बापलेकांनी आपले आयुष्य संपवले.
कागोणी शिवारातील गट क्रमांक ४० मध्ये मोटे यांची साडेचार एकर शेती आहे. बुधवारी कांद्याला पाणी देण्याच्या मुद्द्यावरून मुलगा सुरेश आणि त्याचे वडील कैलास मोटे यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर सुरेश घरातून निघून गेला होता. त्यांच्या शेतातील तलावाजवळ त्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. गुरुवारी रात्री त्याचा अंत्यविधी झाल्यावर त्याचे वडील कैलास मोटे हे घरातून बेपत्ता झाले. शुक्रवारी त्यांच्या शेतातील विहिरीजवळ त्यांची मोटारसायकल, विषारी औषधाचा डबा आणि चपला आढळून आल्या. याची दखल घेत वांजरगाव येथील सुरेश लहिरे, सुभाष लहिरे व कागोणीचे पोलीस पाटील मच्छिंद्र धनाड यांच्यासह ग्रामस्थांनी कैलास मोटे यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
-- फोटो