संजय खाकरे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : येथील उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन गेल्या पाच महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या महिलांना सोनोग्राफीसाठी खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे. परिणामी त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.१०० खाटांचे परळीला उपजिल्हा रुग्णालय आहे. या शासकीय रुग्णालयात असलेले सोनोग्राफी मशीन नादुरुस्त आहे. गेल्या पाच महिन्यांपासून मशीन बंद अवस्थेत असल्याने सोनोग्राफीसाठी आलेल्या रुग्णांना सोनोग्राफी तपासणी करताच येत नाही. महिला व पुरुषांची सोनोग्राफी बाहेरील खाजगी रुग्णालयात करावी लागत आहे. विशेषत: गरोदर महिलांची मोठी गैरसोय होत आहे. बाहेर खाजगी रुग्णालयात दोन तास सोनोग्राफीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. शिवाय, ७०० रुपये खर्च करावे लागतात ते वेगळेच! त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. उपजिल्हा रुग्णालयात नवीन सोनोग्राफी मशीन उपलब्ध करावे, अशी मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता दहिवाळ, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर, शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर, ऋषिकेश बारगजे, बालाजी चुनचुने, रवींद्र नेमाणे, डॉ. घनचक्कर यांनी केली आहे. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही यासंदर्भात निवेदन देण्यात आले असल्याचे श्रीकांत पाथरकर यांनी सांगितले.याशिवाय सिटी स्कॅन मशीनही अद्याप सुरू झालेली नाही. याचाही रुग्णांना फटका बसत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. दीपक तांदळे, सय्यद सिराज यांनीही यापूर्वी सोनोग्राफी मशीन चालू करण्याची वैद्यकीय अधीक्षकांकडे मागणी केलेली आहे. तरीही अद्याप ही सोय उपलब्ध झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चंदुलाल बियाणी म्हणाले की, उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी मशीनची सोय व अन्य मागण्या मान्य न झाल्यास येत्या १० जूनपासून तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.
पाच महिन्यांपासून सोनोग्राफी बंद
By admin | Published: May 27, 2017 10:57 PM