लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता आणि जिल्ह्यात वाढणारी रुग्णांची संख्या पाहता, जिल्हा प्रशासनाने बुधवारपासून कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने पल्स ऑक्सिमीटर, थर्मलगनने अभ्यागतांची तपासणी सुरू केली आहे. या तपासणीत लक्षणे आढळून आल्यास अॅन्टिजेन चाचणी करण्यासाठी पथकदेखील तैनात केले आहे.
बुधवारपासून कडक तपासणी सुरू झाल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील रिकामटेकड्यांचा राबता दुपारनंतर कमी झाला. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या ३९ अभ्यागतांच्या अॅन्टिजेन चाचण्या आरोग्य पथकाने केल्या, त्यात एकजण पॉझिटिव्ह सापडला. हा अभ्यागत राम नगर येथील आहे.
कोरोनाचा संसर्ग संपला, असेच चित्र सर्वत्र निर्माण झाल्यामुळे बाजारपेठा, सरकारी कार्यालयांमध्ये गर्दी वाढत आहे. तसेच प्रवेशद्वारासमोर नियमितपणे होणारी तपासणी ही विशिष्ट बैठकींच्या पार्श्वभूमीवरच केली जात असे. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री किंवा इतर मंत्र्यांच्या बैठका असल्या तर केवळ थर्मलगनने तपासणी केली जाते. एरव्ही सॅनिटायझर, तपासणी करणे बंद होते. परंतु, कोरोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे जिल्हा प्रशासनाने आता कडक तपासणी सुरू केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: केली अॅन्टिजेन चाचणी
प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी बुधवारी स्वत: अॅन्टिजेन चाचणी केली. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले. गर्दी कमी व्हावी म्हणून नाही तर कार्यालयात कुणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण येऊ नये, त्यासाठी तपासणी सुरू केली आहे, असे प्रभारी जिल्हाधिकारी गव्हाणे यांनी सांगितले.