फुलंब्री ( औरंगाबाद) : खुलताबाद रस्त्यावर असलेल्या कृषी सेवा केंद्राचे शटर तोडून चोरट्यांनी तब्बल १५ लाखांचे महागडे बियाणे लंपास केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरात चोरीच्या घटना थांबायला तयार नाही. फुलंब्री ते खुलताबाद या मुख्य मार्गावर सावता कृषी सेवा केंद्र आहे. या केंद्रात बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील विविध कंपनीचे महागड्या बियाणांच्या १८४७ पिशव्या पळवल्या. याची बाजारात किंमत १४ लाख ९६ हजार ७० रुपये अशी आहे. दुकान मालक दिलीप पाथरे यांनी या संदर्भात फुलंब्री पोलिसात तक्रार दिली आहे.
या कृषी सेवाकेंद्रात या पूर्वीही एकदा चोरी झाली होती. दरम्यान, याच महिन्यात शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या एका मोबाईल शॉपीत चोरी झाली होती. त्यावेळी छोट्यांनी तब्बल दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. या चोरीचा अद्याप तपास लागला नाही. तसेच मागील चार दिवसांत शहरातील तीन मेडिकल दुकानात चोरी झाली होती. मात्र, कमी किंमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याने याची पोलिसांत तक्रार देण्यात आली नसल्याची माहिती आहे.