रमेश शिंदे, औसायंदाच्या हंगामात पाऊस उशिरा झाला. हा पाऊस सर्वत्र समान पडला नाही. कुठे कमी तर कुठे बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. रोहिण्या, मृग, आर्द्रा ही तीनही नक्षत्रे कोरडी गेली. त्यामुळे पेरण्यांना तब्बल महिनाभर उशीर झाला. पेरण्या लांबल्यामुळे आता शेतकऱ्यांची पेरण्यासाठी लगबग सुरू आहे. पेरण्यांना विलंब होत असल्यामुळे आता बैलबारदाना असलेले शेतकरीही ट्रॅक्टरद्वारे पेरण्या करताना दिसत आहेत. औसा तालुक्यात मागील तीन-चार दिवसांपासून पेरण्यांनी वेग घेतला असून, जवळपास ६० ते ७० टक्के पेरण्या उरकल्या आहेत.औसा तालुक्यात ८५ हजार ते १ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पेरण्या होतात. पण यावर्षी खरीप हंगामाच्याा पेरण्यासाठीचा पाऊसच तब्बल महिनाभर उशिराने पडला. प्रत्येकवर्षी मृग, आर्द्रात पेरण्या होतात. पण या दोन्ही नक्षत्रांनी यावर्षी शेतकऱ्यांना चांगलाच दगा दिला आहे. पुनर्वसू नक्षत्रात पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतकरी आता पेरण्यात व्यस्त झाला आहे. मागील तीन-चार वर्षांपासून निसर्गाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या या तालुक्यात बैलबारदाना मोठ्या प्रमाणात मोडीत काढला आहे. ज्यांच्याकडे बैलबारदाना नाही, असे शेतकरी तर ट्रॅक्टराद्वारेच पेरणी उरकत आहेत. पण आता पेरण्या विलंबाने होत असल्यामुळे बैलबारदाना असलेले शेतकरीही पेरण्यांसाठी ट्रॅक्टरच्या मागे धावत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. औसा तालुका हा तसा पावसाळी पाण्यावर अवलंबून असल्यामुळे आणि शेती हाच मुख्य व्यवसाय असल्यामुळे बैलांची संख्याही बऱ्यापैकी आहे. जवळपास ६३ हजार इतके बैल तालुक्याात आहेत. ज्यांच्याकडे बैल आहेत आणि कमी प्रमाणात जमीन आहे अशा शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या असून, त्या अखेरच्या टप्प्यात आहेत. बैलावरील पेरणीही मंदगतीने होते. तर ट्रॅक्टरवरील पेरणी जलदगतीने होते. त्यामुळे सर्रास ट्रॅक्टरवर पेरणी होत आहे. औसा तालुक्यात सध्या १२५ ते १५० पेरणी यंत्र पेरण्या उरकत आहेत.ट्रॅक्टरचालक वजीर पटेल म्हणाले की, ट्रॅक्टरच्या पेरणी यंत्रात खत आणि बियाणे एकदाच भरता येते. पेरणी करण्यासाठी माणसांची आवश्यकता नाही. आपल्याला बी जसे सोडायचे तसे ती सोडण्याची व्यवस्था आहे. नियामक बी व खत पेरणी होत असल्याने शेतकरी ट्रॅक्टरला पसंती देत आहेत, असे सांगितले.ओमप्रकाश सूर्यवंशी हे शेतकरी म्हणाले की, ३० एकर जमीन आहे. बैलावर दररोज दोन ते तीन एकर जमीन पेरणी होते. सर्व जमीन पेरणी होण्यास आठ ते दहा दिवस लागतात. त्यामुळे ट्रॅक्टरवर पेरणी करण्याचा निर्णय घेतला. ट्रॅक्टरवर दिवसभरात सात ते दहा एकर पेरणी होते. आधीच पेरण्यास उशीर झाला. पुन्हा पेरण्यांना उशीर नको म्हणून ट्रॅक्टरवर पेरणी केली. पैसे गेले तर कामही वेळेवर होत असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. ट्रॅक्टरद्वारे पेरणी करण्यासाठी एकरी ६०० ते ८०० रुपये घेतले जातात. दिवसभराच्या कालावधीत जवळपास १२ ते १५ एकर क्षेत्रावर पेरणी होते. बैलाद्वारे होणाऱ्या पेरणीपेक्षा या पेरणीचा वेग जास्त असल्याने शेतकऱ्यांचा कलही वाढला असल्याचे ट्रॅक्टर मालक अजित फावडे यांनी सांगितले.पावसाने विलंब केल्याने शेतकरी सध्या लवकर पेरण्या उरकण्यासाठी धावपळ करीत आहेत. चार पैसे जास्त गेले तरी हरकत नाही. परंतु, वेळेत पेरणी व्हावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे बैलबारदाना असणारे शेतकरीही ट्रॅक्टरचा वापर करीत असल्याचे दिसून येत आहे.
ट्रॅक्टरद्वारे वाढली पेरणी
By admin | Published: July 14, 2014 11:40 PM