औरंगाबाद : यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या असून, मागील तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. शेतकऱ्यांची पेरण्यांसाठी लगबग सुरू झाली असून, आतापर्यंत अवघ्या ७ हजार १८२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये ४ हजार ९०५ हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे.
या संदर्भात जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार म्हणाले की, जिल्ह्यामध्ये आतापर्यंत औरंगाबाद आणि फुलंब्री तालुके वगळता अन्य एकाही तालुक्यात १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झालेला नाही. १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असे कृषी विभागाने आवाहन केले होते. असे असले तरी फुलंब्री आणि सिल्लोड या दोन तालुक्यांत कापसाची पेरणी बऱ्यापैकी झाली आहे.
यामध्ये औरंगाबाद तालुक्यात आजपर्यंत कापसाची लागवड ३५ हेक्टर, पैठण तालुक्यात ११८ हेक्टर, फुलंब्री तालुक्यात १०१० हेक्टर, वैजापूर तालुक्यात ७५ हेक्टर, गंगापूर तालुक्यात ३९५ हेक्टर, सिल्लोड तालुक्यात ३ हजार ०६९ हेक्टर, कन्नड तालुक्यात १०८ हेक्टर, सोयगाव तालुक्यात ९५ हेक्टरवर लागवड झाली आहे.
या खालोखाल जिल्ह्यात मक्याची लागवड झाली असून, आतापर्यंत फुलंब्री तालुक्यात १ हजार १७५ हेक्टर, सिल्लोड तालुक्यात ६४८ हेक्टर, वैजापूर तालुक्यात ९५ हेक्टर, कन्नड तालुक्यात १३९ हेक्टर, सोयगाव तालुक्यात १२५ हेक्टरवर अशी एकूण २ हजार १८२ हेक्टरवर मक्याची पेरणी झाली आहे. बोंडअळीमुळे गेल्या वर्षी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा कपाशीच्या क्षेत्रात घट होईल, अशी अपेक्षा होती; परंतु यंदाही शेतकऱ्यांचा कल हा कपाशीकडेच असल्याचे दिसून येते.
यंदा जिल्ह्यात सरासरीच्या ८३.८० मि.मी. पाऊसजिल्ह्यात आजपर्यंत सरासरी ८३.८० मिमी एवढाच पाऊस झाला. या तुलनेत गेल्या वर्षी २५ जूनपर्यंत सरासरी १२८.०२ मिमी एवढा पाऊस झाला होता. यंदा जूनमध्ये आजपर्यंत औरंगाबाद तालुक्यात १३५.८० मिमी., फुलंब्री तालुक्यात १२९.७५ मिमी, पैठण तालुक्यात ६३.७० मिमी, सिल्लोड तालुक्यात ६७.६७ मिमी, सोयगाव तालुक्यात ९०.९९ मिमी, कन्नड तालुक्यात ९१.१४ मिमी, वैजापूर तालुक्यात ६८.५० मिमी, गंगापूर तालुक्यात ५८ मिमी, खुलताबाद तालुक्यात ४८.६६ मिमी एवढा पाऊस झाला आहे.