सोयगाव : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यासाठी सोमवार दिलासादायक ठरला आहे. तालुक्यातील तब्बल ७२ संशयितांचा अहवाल निगेटिव्ह आला असून जरंडी आणि निंबायतीच्या कोविड केंद्रातून तब्बल १२ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे.
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने सोयगाव तालुका अक्षरशः होरपळला गेला आहे. मात्र सोमवार सोयगावसाठी सुखद ठरला. सध्या तालुक्यातील जरंडी कोविड केंद्रात १९ व निंबायती केंद्रात ७ जणांवर उपचार सुरू आहेत. परिणामी तालुक्यातील रुग्णांची संख्या २६ वर येऊन ठेपली आहे.
सोयगाव तालुक्यात आरोग्य विभागाने कोरोना चाचण्यांची संख्या वाढविली आहे. तर ९७ टक्के नागरिक मास्कचा वापर करीत असल्याचा अहवाल तालुका आरोग्य विभागाने दिला आहे. त्यामुळे तालुक्यावर आलेली कोरोनाची दुसरी लाट संपल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहून योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास सोनवणे यांनी केले.