साखरा : सेनगाव तालुक्यातील साखरा परिसरात गेल्या आठवडाभरापासून सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे. मात्र यंदा पावसाअभावी सोयाबीनच्या उतार्यात प्रचंड घट येत असल्याने शेतकरी हवालदिल बनला आहे.
सद्य:स्थितीत सोयाबीनला प्रतीबॅग एक ते दीड क्विंटलचा उतारा येत आहे. परिणामी शेतकर्यांचा उत्पादन खर्च निघत नाही. परिसरात सर्वच ठिकाणी कमी उतारा येत आहे. यामध्ये साखरा, उटी ब्रम्हचारी, पाटोदा, हत्ता, केलसुला, हिवरखेडा, घोरदरी, बोरखेडी, खडकी, पोतरा, पिनगाळे, सोनसावंगी यासह परिसरातील शिवारात कमी उत्पादन होत असल्याने शेतकरी धास्तावले आहे. शेतकर्यांपुढे कर्ज फेडीचे मोठे संकट उभे ठाकले असून, सोयाबीन हे नगदी पीक हातचे गेल्याने संपूर्ण वर्षाचे गणित बिघडले आहे.
बोरखेडी येथील शेतकरी माधव वामन लांभाडे यांना प्रतीबॅग १ क्विंटल उतारा आला. तसेच येथीलच शेतकरी शिवाजी देवबाराव इंगळे यांना दोन बॅगला तीन पोती एवढा उतारा आला आहे. केलसुला येथील शेतकरी उकंडी सोनाजी कळंबे यांना पाच बॅगला १0 पोते एवढा तर साखरा येथील शेतकरी राहूल शिवमूर्ती स्वामी यांना तीन बॅगला सात पोते एवढा उतारा आला. एवढा प्रचंड कमी उतारा परिसरात येत आहे. उत्पादन खर्च प्रतीबॅगला ८ ते ९ हजार रुपये आला. यामध्ये सोयाबीनची बॅग १ हजार ६00 रुपये, खत १ हजार रुपये, फवारणी खर्च २ हजार रुपये, मळणीयंत्र खर्च व सोयाबीन काढणी मजुरी २ हजार ५00 तर निंदण मजूरी ८00 रुपये शेतमजूर खर्च आदींचा समावेश आहे. सद्य:स्थितीत सोयाबीनला प्रती क्विंटल २ हजार ५00 ते २ हजार ८00 रुपये एवढा भाव मिळत आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. (वार्ताहर)
■ उत्पादन खर्चदेखील निघत नसल्याने शेतकर्यांचे हाल होत आहेत.
■ महसूल व कृषी विभागाकडून वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकर्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
■ परतीचा पाऊसही न पडल्याने खरीपासह रबी पिकेही येण्याची आशा माळवली आहे.
■ एकंदरीत शेतकर्यांचे संपूर्ण वर्षच वाया गेल्याने कर्जाची फेड व उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
■ सेनगाव तालुक्यातील साखरा परिसरामध्ये पाण्याअभावी पिके हातातून गेली आहे.
■ सोयाबीनच्या उतार्यात प्रचंड घट झाली असून धान्याला चांगला भावदेखील मिळेना झाला आहे.