सोयगाव : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याआधीच सदस्यांची पळवापळवी सुरू झाल्याने तालुक्यात पुन्हा राजकारण तापले आहे.
विकास सेवा संस्थेसाठी तालुक्यात एका जागेसाठी मतदान होणार आहे. यामध्ये संभाव्य दोन उमेदवारांची नामनिर्देशन पत्र दाखल झालेली आहेत. मात्र, अद्यापही जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालेले नाही. असे असताना मात्र, सदस्यांची पळवापळवी सुरू झाल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. तालुक्यातून सोसायटी मतदारसंघासाठी ३६ मतदार आहेत. किमान १९ जणांचे मतदान मिळालेल्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे. त्यामुळे मतदान आपल्याच पारड्यात पडले पाहिजे. यासाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याआधीच सदस्यांची पळवापळवी केली जात असल्याने चित्र तालुक्यात आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सक्रिय असल्याचे दिसत आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मात्र सोयगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातच लढाई होणार हे सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे. सोयगावला ग्रामपंचायतीच्या निवडणुकांनंतर पुन्हा नगरपंचायतीच्या निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांकडून केली जात आहे. मात्र, शिवसेनेने याआधीच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याची घोषणा केली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात समन्वय न झाल्याने त्यांच्यात होणारी लढत तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.