सोयगाव : नगरपंचायत निवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीचा कार्यक्रम संपला असून यावर दाखल हरकती व सूचनांबाबत सुनावणी झाली. या निवडणुकीसाठी सहा हजार ४२४ मतदार आपला हक्क बजावणार असून यात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून तीन हजार १४१ महिला मतदार आहेत. ३ हजार २८३ पुरुष मतदारांची संख्या आहे. महिला उमेदवारांसाठी सोयगाव नगर पंचायत जमेची बाजू ठरली असून महिलांचे मतदान पारड्यात पाडून घेण्यासाठी पुरुष मतदारांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
सोयगाव नगर पंचायतीच्या प्रारूप मतदार यादीचा कार्यक्रम अंतिम टप्प्यात असून १ मार्चला प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करण्यात येणार आहेत. त्यानंतर ८ मार्चला प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. माधुरी तिखे यांनी स्पष्ट केले. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याचे चित्र असताना अचानक कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्याने नगराध्यक्षपदाच्या सोडतीची मुदत लांबणीवर पडली आहे. त्यामुळे नगर पंचायतीच्या निवडणुकाही लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत असली तरी निवडणूक विभागाकडून मतदारांच्या अंतिम याद्या तयार करण्यात येत आहेत. यासह राजकीय पक्षांकडूनही उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. शिवसेनेकडून राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री खा. रावसाहेब दानवे यांची या निवडणुकीसाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
--- ------
या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून प्राप्त सूचनेनुसार प्रारूप मतदार कार्यक्रम अंतिम टप्प्यात असून प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी ८ मार्चला प्रसिद्ध होईल. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी प्राप्त सूचनांची अंमलबजावणी करण्यात येईल. त्यामुळे सध्या तरी कोणताही कार्यक्रम स्थगित करण्यात आलेला नाही.
-- डॉ. माधुरी तिखे,
उपविभागीय अधिकारी, सोयगाव
---------------------------बातमी पूर्ण-------