सोयगाव : तालुक्यासाठी अखेर चाळीस ऑक्सिजनयुक्त बेडची मंजुरी मिळाली. जरंडीच्या कोविड केंद्रात ऑक्सिजन बेड जोडले जाणार आहेत. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी जिल्ह्यासाठी राखीव केलेल्या १५०० ऑक्सिजन सिलिंडरमधून जरंडीला ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी शनिवारी दिली. त्यामुळे येत्या काळात सोयगाव तालुक्यातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे, तर ऑक्सिजनअभावी होणारी रुग्णांची भटकंती थांबली जाणार आहे.
जरंडी, निंबायती कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनचा अभाव असल्याने रुग्णांना जळगाव आणि औरंगाबादला रेफर केले जात आहे. वेळप्रसंगी काही रुग्णांचा वाटेतच मृत्यू झालेला आहे. त्याची दखल घेत जिल्हा परिषद सदस्या पुष्पा काळे यांनी ऑक्सिजनयुक्त बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा केला. त्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. जरंडी कोविड केंद्रातील चाळीस बेडवर ऑक्सिजन यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. त्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे, असे जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी दिली. जिल्ह्यासाठी राखीव करण्यात आलेल्या १५०० सिलिंडरमधून जरंडीला ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात १५०० ऑक्सिजन सिलिंडर राखीव करण्यात आले असून, त्यापैकी सोयगाव तालुक्यासाठी काही सिलिंडर तातडीने पाठविले जातील. जरंडी केंद्रावरील चाळीस बेड ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत पुनर्विचार झालेला आहे. गरज भासणाऱ्या रुग्णांना आता सुविधा मिळेल.
- डॉ. मंगेश गोंदावले, सीईओ.
सोयगाव तालुक्यासाठीची तज्ज्ञाअभावी रद्द झालेल्या मध्यवर्ती ऑक्सिजन यंत्रणेवर पुनर्विचार झाला आहे. ऑक्सिजन यंत्रणा हाताळण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास सोनवणे यांच्यासह अन्य तीनही डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जरंडीला मध्यवर्ती ऑक्सिजन यंत्रणेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना दिला.
- डॉ. सुधाकर शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी