औरंगाबाद : प्रोझोन मॉल मधील दोन स्पा सेंटरवर धाड मारून पोलिसांनी आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. त्या दोन्ही स्पा मध्ये ८लाखाची रोकड, तीन लॅपटॉप, मोबाईल आणि इतर किंमती वस्तू, विदेशी चलन असा सुमारे १३ लाख ४५ हजार ९७५रुपयांचा मुद्देमाल मिळाला. हा स्पा चालकासह, तेथील दोन मॅनेजर आणि तीन ग्राहकांना पोलिसांनी अटक केली तर ९ विदेशी आणि ३ स्थानिक मुलींची सुटका केली.
गुरूवारी रात्री झालेल्या कारवाईविषयी अधिक माहिती देण्यासाठी पोलीस उपायुक्त डॉ.दीपाली धाटे-घाडगे यांनी शुक्रवारी दुपारी एमआयडीसी सिडको ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, मसाज पार्लरच्या नावाखाली दी स्ट्रेस स्पा आणि अनंतरा स्पा मध्ये छुप्या मार्गाने आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट सुरू होते. या रॅकेटविषयी माहिती मिळताच पोलिसांनी गुरूवारी रात्री डमी ग्राहक पाठवून तेथे छापा मारला. या छाप्यात रोहन राजेंद्र कुलकर्णी, अकीब अक्रमखान पटेल, विदेशी नागरीक येमेन अब्ुदल हमीद हे ग्राहक पोलिसांच्या हाती लागले. हे दोन्ही स्पा मुंबईतील एकच व्यक्ती चालवित असल्याचे समोर आले. त्याच्या मालकाचे अचुक नाव अद्याप समोर आले नाही. दी स्ट्रेस स्पा येथे हा असिस्टंट मॅनेजर म्हणून आरोपी सुनील कचरू नवतुरे , शेख तौफिक शेख अफसर हे तर रूम बॉय म्हणून आरोपी राहुल माणिकराव नलावडे काम करायचा. त्यांनाही पोलिसांनी अटक केली. याशिवाय अनंतरा स्पा सेंटरची स्थानिक मॅनेजर महिला असून तिलाही पोलिसांनी अटक केली.
विदेशी मुली पुरविण्याचे अमिष आरोपी हे स्पा च्या नावाखाली वार्षिक पॅकेज ग्राहकांकडून घेत आणि त्यांना मसाज करू न देण्याच्या नावाखाली स्पा मध्ये बोलवत. स्पा सेंटरमध्ये दाखल झाल्यानंतर तेथील तरूणींना मसाज करण्यास सांगून त्या मुली ग्राहकांना सेक्स संदर्भात आॅफर देत आणि तेथून पुढे त्या विषयीचा वेगळे चार्जेस ते आकारत. विशेष म्हणजे हे चार्जेस केवळ रोख स्वरुपातच घेतले जात. विशेष म्हणजे ग्राहक किती देऊ शकतो, यानुसार ते पाच हजार रुपयांपासून ते पन्नास हजार रुपये ग्राहकांकडून उकळत.