लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न १२७ महाविद्यालये, विद्यापीठातील ४२ विभाग आणि उस्मानाबाद उपकेंद्रातील विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या एकूण २१ हजार ९८१ जागा उपलब्ध असल्याची आकडेवारी प्रशासनाने सोमवारी प्रसिद्ध केली. मात्र या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटीला १८ हजार ६१४ विद्यार्थ्यांनीच हजेरी लावली. यामुळे विद्यापीठ व महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या किमान तीन हजार जागा रिक्त राहणार आहेत. विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच महाविद्यालये आणि विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी एकत्रित प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) १० जुलै रोजी चार जिल्ह्यांतील ५७ केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल रविवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. महाविद्यालये, विद्यापीठ आणि उस्मानाबाद उपकेंद्रातील विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या उपलब्ध जागांची आकडेवारी डॉ. सतीश पाटील यांनी जाहीर केली. या आकडेवारीनुसार विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या एकूण २१ हजार ९८१ जागा उपलब्ध आहेत. या जागांमध्ये पदव्युत्तर व्यवस्थापनशास्त्र, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, शिक्षणशास्त्र आदी राज्य सरकारने प्रवेशपूर्व परीक्षा घेतलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या १२७० जागांवर राज्य सरकारच्या सीईटीच्या माध्यमातून प्रवेश होतील. मात्र उर्वरित कला, वाणिज्य, विज्ञानसह इतर पदव्युत्तर अभ्यासक्रमांना विद्यापीठाने घेतलेल्या सीईटीच्या आधारे प्रवेश देण्यात येणार आहेत. सीईटीला हजर १८ हजार ६१४ विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थी प्रत्यक्षात पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात, यावर रिक्त जागांचा आकडा अवलंबून राहील. मात्र उपलब्ध जागा जास्त आणि विद्यार्थी कमी, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
जागा २२ हजार; परीक्षेला १८ हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 1:06 AM