औरंगाबाद : अगदी लहान, सूक्ष्म अशी उपमा देण्यासाठी ‘चिमणी’ हा शब्द वापरला जातो. पण या लहानशा चिमणीची करामत अचंबित करणारी असून, अळ्या, कीटक यांचा नायनाट करणारा ‘नैसर्गिक कीटकनाशक’ म्हणून चिमणी ओळखली जाते. चिमणीची झपाट्याने खालावणारी संख्या पर्यावरणाचा असमतोल सांगणारी आहे. म्हणूनच आता फक्त टीव्हीवरच ऐकू येणारा चिवचिवाट प्रत्यक्ष ऐकू येण्याची गरज निर्माण झाली आहे.
चिमणी हा अन्नसाखळीतील एक महत्त्वाचा घटक असून, चिमण्यांची संख्या लक्षणीय प्रमाणात कमी होणे चिंताजनक आहे. म्हणूनच चिमणीविषयी जनजागृती निर्माण व्हावी म्हणून २०१० पासून जागतिक स्तरावर चिमणी दिवस साजरा केला जातो. पक्ष्यांच्या आकडेवारीविषयी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार चिमण्यांची संख्या वाढलेली आहे. पण याबाबत पक्षीप्रेमींमध्ये मतभेद दिसून येतात. तरीही चिमण्यांची संख्या जरी वाढलेली असली तरी ती वाढ अजूनही समाधानकारक म्हणण्याइतपत नाही, याबाबतीत मात्र एकमत आहे.
हाऊस स्पॅरो आणि जंगल स्पॅरो (पितकंठी) असे चिमण्यांचे दोन प्रकार आहेत. यापैकी हाऊस स्पॅरो जातीच्या चिमण्यांची संख्या कमी होत आहे. हाऊस स्पॅरो मानवाच्या सहवासाने राहतात. तसेच पितकंठी चिमण्या दाट झाडीत, जंगलांमध्ये दिसून येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या सिमेंटीकरणामुळे हाऊस स्पॅरो जातींच्या चिमण्या कमी होत आहेत. मोबाईलच्या लहरींमुळे चिमण्यांची संख्या कमी होत आहे, ही गोष्ट अजून अभ्यासाने सिद्ध झालेली नाही.खरकटे अन्न, बोंडअळ्या, लष्करी अळ्या, किडे हे चिमण्यांचे खाद्य आहे. सुदृढ पर्यावरण, उत्तम शेती यांचे निदर्शक म्हणून चिमण्यांकडे पाहिले जाते. त्यामुळे चिमण्या जर कमी झाल्या तर शेती आणि पर्यावरणाचे आरोग्य बिघडते, असे अभ्यासक सांगतात. त्यामुळे चिमण्यांची संख्या वाढण्यासाठी लोकांनी पुढाकार घ्यावा, झाडा-झुडपांची लागवड घराभोवती करावी, असे आवाहन पर्यावरणप्रेमी करतात.
चिमण्यांचीच संख्या वाढावी म्हणून आग्रह का? ४इतर अनेक पक्षी असताना चिमण्यांचीच कमी होणारी संख्या एवढी चिंतेची बाब का आहे? पक्षीतज्ज्ञ डॉ. दिलीप यार्दी यांनी याविषयीची चीनमध्ये काही वर्षांपूर्वी घडलेली एक सत्यघटना सांगितली. चीनमधील ज्या भागात भाताचे पीक घेतले जाते, तेथील लोकांनी तक्रार केली की, येथे चिमण्या अधिक असल्यामुळे आमचे भाताचे उत्पन्न घटते. यावर इलाज म्हणून त्या भागातील सर्व चिमण्या मारून टाकण्याचे आदेश देण्यात आले.४काही पर्यावरणप्रेमींनी याला विरोध केला, पण हा विरोध न जुमानता आदेशाची अंमलबजावणी झाली. यानंतर भरघोस पीक येईल, अशी लोकांची अपेक्षा होती. पण ही अपेक्षा फोल ठरली. कारण पिकांवरील अळ्या आणि कीटकांचे प्रमाण प्रचंड वाढले आणि त्यात अर्ध्यापेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले. ४एक चिमणी आणि तिची पिले दिवसभरातून कमीत कमी अडीचशे लहान- मोठ्या अळ्या, किडे खातात. यामुळे साहजिकच पिकांची, झाडांची हानी होत नाही. म्हणून चिमणीबाबत पर्यावरणप्रेमी कायमच आग्रही भूमिका घेतात. जिथे भरपूर चिमण्या तेथील शेती, झाडी सशक्त असे सूत्र सांगितले जाते.
झाडा-झुडपांचे प्रमाण वाढावेमानवाच्या सहवासाने राहणारा पक्षी म्हणून चिमणी ओळखली जाते. जंगलात किंवा एकांतात चिमणी राहू शकत नाही. वाढलेले सिमेंट काँक्रिटीकरण, झाडा-झुडपांचे कमी झालेले प्रमाण या बाबी प्रामुख्याने चिमण्यांची संख्या घटण्यास कारणीभूत ठरत आहे. जास्वंद, कन्हेर, बाभळी यासारख्या भारतीय जातीच्या झाडा-झुडपांचे प्रमाण वाढले तर चिमण्यांची संख्या वाढेल. शहरी भागातून ७० टक्के तर ग्रामीण भागातून ३० ते ४० टक्के चिमण्यांची संख्या कमी झाली आहे.- डॉ. किशोर पाठक, पक्षीतज्ज्ञ