औरंगाबाद : हेल्मेट घातले नाही म्हणून चक्क कार चालकाला ५०० रुपये दंडाचे ई-चलान बजावण्यात आले आहे. विशेष म्हणजे कारचालकाकडे चारचाकी वाहन चालविण्याचा वैध परवाना आहे, असे असताना वाहन चालविण्याचा वैध परवाना नसल्याचे कारण दर्शवून पुन्हा ५०० रुपये दंड आकारण्यात आला असल्याची बाब निदर्शनास आली आहे.
उच्च न्यायालयातील ॲड. अजितकुमार दळवी यांना जिल्हा विधि सेवा प्राधिकरणामार्फत नोटीस बजावण्यात आली आहे. याचिकाकर्ता पोलीस आयुक्त यांनी ॲड. दळवी त्यांचे वाहनाबाबत नोंदविलेले वाहतूक चालान १२ मार्चला आयोजित दाखलपूर्व दाव्यांसाठीच्या लोकअदालतीकडे पाठविण्यासाठी अर्ज सादर केला आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, ॲड. दळवी यांनी २८ मार्च २०२० रोजी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून मोटार वाहन अधिनियमांच्या तरतुदीनुसार शिक्षापात्र व तडजोडपात्र अपराध केला आहे.
ॲड. दळवी यांचे म्हणणेॲड. दळवी यांचे असे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे चार चाकी होंडा अमेझ कार आहे. चलानमध्ये दर्शविलेल्या वाहनाचा नंबर हा त्याच कारचा आहे. चलानमधील घटना कुठली आहे, माहीत नाही. माझ्याकडे ॲक्टिव्हा ही दुचाकी आहे, मात्र, मी तिचा वापर करत नाही व तिचा क्रमांक वेगळा आहे.