छत्रपती संभाजीनगर : सिडको-हडकोत जिथे मोकळी जागा दिसेल तेथे कच्ची आणि पक्की अतिक्रमणे करण्यात आली होती. अतिक्रमण केलेल्या मंडळींनी या जागा भाडेतत्त्वावर दिल्या. त्याचा भाडे करारनामा पाहून महापालिकेचे अधिकारीही शुक्रवारी अवाक झाले. एका रसवंतीगृह चालकाकडून दररोज एक हजार रुपये भाडे आणि डिपॉझिट म्हणून एक लाख रुपये घेण्यात आले.
सिडको-हडकोतील अतिक्रमणे काढण्याची माेहीम मागील एक महिन्यापासून सुरू आहे. शुक्रवारी मनपाच्या पथकाने तब्बल २० अतिक्रमणे काढली. सिडको एन-५ येथील सचिन नागुल यांनी सरकारी रस्त्यावर अतिक्रमण केले. जागा रसवंती चालकाला भाडेतत्त्वावर दिली. मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिक चौकशी केली असता अतिक्रमित जागेचे दरमहा ३० हजार रुपये वसूल करण्यात येत होते. नागुल यांचा प्लॉट क्रमांक ८७ असून त्यांनी त्यांच्या घराच्या बाजूला शासकीय जागा असून, त्या खालून पाइपलाइन जात आहे. त्यांनी अंदाजे १२ बाय ३० या आकाराच्या जागेवर अतिक्रमण केले.
विशेष बाब म्हणजे कमर्शियल मीटरही घेतले होते. हे अतिक्रमण काढण्यात आले. याच परिसरात पुजारी यांनी त्यांच्या सामासिक अंतर व पार्किंगच्या जागेत रसवंती भाडेतत्त्वावर दिली होती. ही कारवाई रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये, सविता सोनवणे, बांधकाम निरीक्षक सय्यद जमशेद, पंडित गवळी, सिडकोचे मिलन खिल्लारे आदींनी केली.