लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : यवतमाळ जिल्ह्यात पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना अनेक शेतक-यांना जीव गमवावा लागला. ही घटना जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेतली असून, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अशी अनुचित घटना घडू नये, यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करून कृषी विभागाने शेतक-यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. १ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी विशेष ग्रामसभेचे आयोजन करावे, असे आवाहन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी केले आहे.या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने १३ आॅक्टोबर रोजी कृषी विभागाचे क्षेत्रिय अधिकारी, आरोग्य अधिकारी तसेच सर्व कीटकनाशके व बियाणे विक्रेत्यांची कार्यशाळा घेतली.या कार्यशाळेत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कीटकनाशके हाताळावी कशी किंवा त्यांची फवारणी करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, या विषयी ग्रामसभेच्या माध्यमातूून शेतक-यांचे प्रबोधन करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेला दिल्या होत्या.त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड यांनी सर्व ग्रामपंचायतींना आवाहन केले आहे. ग्रामसभेत याशिवाय कापूस पिकावरील शेंदरी बोंडअळीचे नियंत्रण, शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेबद्दल शेतक-यांना माहिती दिली जाणार आहे.ग्रामसभांसाठी निरीक्षक म्हणून शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, सर्व विभागांचे विस्तार अधिकारी तसेच तालुका आरोग्य अधिकाºयांची नियुक्ती करण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिका-यांची देखील या ग्रामसभांना उपस्थिती राहणार आहे. कार्यशाळेत पंचायत समित्यांमधील कृषी अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, राज्य शासनाच्या कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक आदी शेतक-यांना माहिती देणार आहेत.
जिल्ह्यात १ नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:38 AM