छत्रपती संभाजीनगर : परिक्षेत्राचे नवीन विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी शुक्रवारी पदभार स्विकारला. मावळते विशेष पोलिस महानिरीक्षक के.एम. मल्लीकार्जुन प्रसन्ना यांनी हा पदभार सोपवला आहे.
राज्य शासनाने २४ एप्रिल रोजी विशेष पोलिस उपमहानिरीक्षकांच्या पदोन्नतीचे आदेश काढले होते. त्यामध्ये मुंबई येथे अप्पर पोलिस आयुक्तपदी कार्यरत असलेले डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांची पदोन्नतीने छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. तर आयजी के.एम. मल्लीकार्जुन प्रसन्ना यांची पोलिस महासंचालक कार्यालयात अस्थापना विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी बदली केली. हा आदेश निघाल्यानंतर दहा दिवसांनी डॉ. चव्हाण यांनी प्रसन्ना यांच्याकडून विशेष पोलिस महानिरीक्षकपदाचा पदभार स्विकारला.
यावेळी प्रसन्ना यांनी डॉ. चव्हाण यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर डॉ. चव्हाण यांनी प्रसन्ना यांना पुष्पगुच्छ देऊन आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. चव्हाण हे १९९३ साली राज्य पोलिस दलात उपविभागीय अधिकारी म्हणून दाखल झाले होते. धुळे जिल्ह्यातील शहादा येथे त्यांनी उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर पुणे शहर, छत्रपती संभाजीनगर आयुक्तालयातही त्यांनी सहायक पोलिस आयुक्त म्हणून आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. पदोन्नती झाल्यानंतर त्यांनी ठाणे येथे पोलिस उपआयुक्त ( वाहतूक ), पिंपरी चिचवड, सीआयडी क्राइम, राज्य गुप्ता वार्ता विभागात कार्य केले आहे. सध्या ते मुंबई येथे गुन्हे विभागाचे अप्प्पर पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत होते.