औरंगाबाद : औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत आपला विशेष ठसा उमटवताना सुवर्णपदकाचा चौकार मारला.मिलिंद भारंबे यांनी चार सुवर्णपदके १५ मीटर ग्रुपिंग फायर, १५ मीटर अॅप्लिकेशन फायर, १५ मीटर रॅपिड फायर आणि सर्वोत्तम नेमबाज म्हणून जिंकली आहेत. सुवर्णपदकांबरोबरच करंडकासह त्यांना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे पोलीस क्रीडा स्पर्धेत ग्रामीण विभागाच्या पोलीस अधीक्षक आरती सिंह यांनीदेखील अॅथलेटिक्समध्ये दोन सुवर्णपदकांची कमाई केली. आरती सिंह यांनी ५ कि. मी. चालण्यात एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकले होते.बॉक्सिंगमध्ये रफिउद्दीनला सुवर्णमुंबई येथील पोलीस क्रीडा स्पर्धेत औरंगाबादच्या रफिउद्दीन कादरी याने बॉक्सिंगमध्येही विशेष ठसा उमटवताना ५२ किलो वजन गटात सुवर्णपदक आणि सर्वोत्तम बॉक्सरचा किताब पटकावला होता. २३ वर्षीय रफिउद्दीन हा मौलाना आझाद महाविद्यालयाचा विद्यार्थी असून, त्याने २०११ मध्ये वर्धा, २०१२ मध्ये चंद्रपूर, २०१५ मध्ये सांगली आणि २०१६ मध्ये त्याने नंदुरबार येथे झालेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत पदकांची लयलूट केली आहे. त्याला बॉक्सिंग प्रशिक्षक सोनू टाक, पोलीस निरीक्षक कलंत्री आणि राहुल टाक यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल त्याचे महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष श्रीकांत जोशी, उपाध्यक्षा केजल भट्ट, सचिव पंकज भारसाखळे, कोषाध्यक्ष आरोह बर्वे, प्रदीप खांड्रे, नीरज भारसाखळे यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक भारंबे यांनी नेमबाजीत मारला सुवर्ण चौकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 1:03 AM