छत्रपती संभाजीनगर : नवनिर्मित प्रभू श्रीराम मंदिरामध्ये श्रीरामाच्या बालमूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारीला होणार आहे. या सोहळ्याला श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने देशभरातील १५० संप्रदायांच्या ४ हजार आचार्य, धर्माचार्य, साधुसंतांना आमंत्रण पाठविण्यात आले आहे. त्यात मराठवाडा व खान्देशातील (देवगिरी प्रांत) ७७ साधुसंत व १५ विशेष व्यक्तींचा समावेश आहे. या सोहळ्यात खारीचा वाटा उचलत ४ हजार साधुसंतांना भगवे वस्त्र भेट देण्यासाठी देवगिरी प्रांताने पुढाकार घेतला आहे.
या संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. संघाचे प्रांत संघचालक अनिल भालेराव, प्रांत कार्यवाह धनंजय धामणे, प्रांत मंत्री योगेश्वर गर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती. विहिंपचे प्रांताध्यक्ष संजय बारगजे यांनी सांगितले की, अयोध्येहून आमंत्रण पत्रिका आल्या आहेत. देवगिरी प्रांतातील ७७ साधुसंत व १५ विशेष आमंत्रित व्यक्तींना येत्या आठ दिवसांत सन्मानपूर्वक आमंत्रण पत्रिका दिल्या जातील. सारे त्यांच्या खासगी वाहनातून अयोध्येला जातील.
१५ फेब्रुवारीला दीड हजार जण जाणार अयोध्येलाबारगजे यांनी सांगितले की, अयोध्येत जाण्यासाठी तेथील न्यासाने देवगिरी प्रांताला १५ फेब्रुवारीची तारीख दिली आहे. मराठवाडा व खान्देशातील १५ जिल्ह्यांतून दीड हजार भाविकांना अयोध्येत नेण्यात येणार आहे. यात ३०० जण विशेष आमंत्रित आहेत.
१५ दिवसांत ११ हजार गावातील लोकांना वाटणार अक्षतादेवगिरी प्रांतातील ११३३२ गावे व १०५७ वस्त्यांमधील ४० लाख कुटुंबापर्यंत म्हणजेच सुमारे २ कोटी लोकांपर्यंत दीड लाख कार्यकर्ते १ ते १५ जानेवारी दरम्यान पोहोचणार आहे. २२ जानेवारीला घराजवळील मंदिरात श्रीराम प्राणप्रतिष्ठापना महोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. त्यात पत्रिका, मंदिराचा फोटो व अक्षता देण्यात येणार आहेत.