औरंगाबाद : जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांत नावालाच स्पेशालिस्ट डॉक्टर्स आहेत. जिल्हा रुग्णालयातच स्पेशालिस्ट डॉक्टर देण्यावर भर आहे. उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयांत केवळ स्त्रीरोग, बाधिरीकरण आणि बालरोगतज्ज्ञ देण्यावरच भर आहे. एमबीबीएस डॉक्टरांच्या जोरावरच रुग्णसेवा सुरू आहे.
परिणामी अन्य स्पेशालिटी उपचारासाठी ग्रामीण भागांतील रुग्णांना थेट घाटी आणि खासगी रुग्णालयांचा रस्ता धरावा लागत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात स्पेशालिस्ट डॉक्टरांची १९ पदे मंजूर आहेत. पण आजघडीला मनोविकृती चिकित्सक, अस्थिव्यंग शल्यचिकित्सक, क्ष-किरण शास्त्रज्ञ, चर्मरोग वैद्यकीय अधिकारी, क्षयरोग वैद्यकीय अधिकारी, नेत्र शल्यचिकित्सक ही पदे रिक्त आहेत. ग्रामीण भागातील उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयांत वैद्यकीय अधिकाऱ्यांवर रुग्णसेवेची मदार आहे. प्रसुती आणि बालकांच्या उपचारापुरतीच सरकारी रुग्णालये मर्यादित राहात आहेत. स्पेशालिटी उपचारासाठी घाटी रुग्णालयात यावे लागते अन्यथा तालुक्यातील, शहरातील खासगी रुग्णलयात धाव घ्यावी लागते. वैजापूर उपजिल्हा रुग्णालय सोडले तर अन्य ठिकाणी सरकारी रुग्णालयात आयसीयू बेडच नाहीत. परिणामी शासनाकडून व्हेंटिलेटर मिळूनही त्याचा वापर करता येत नसल्याची सरकारी रुग्णालयांची अवस्था आहे.
--
ग्रामीण भागांत आयसीयू बेडची वानवा
ग्रामीण भागांत सरकारी रुग्णालयांत आयसीयू बेडची वानवा आहे. त्यासाठी खाटांचा नियम पुढे केला जातो. ज्या रुग्णालयात १०० खाटा तेथे ३ आयसीयू बेडचा नियम आहे. त्यानुसार केवळ वैजापूर येथे ३ आयसीयू बेड आहेत. तर २०० खाटा असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात ६ आयसीयू बेड आहेत. कोरोनामुळे येथे या खाटा १५वर गेल्या. पण या सगळ्यात आयसीयू तज्ज्ञ पुरेसे नाहीत. परिणामी २६ व्हेंटिलेटर हे खासगी रुग्णालयांना देण्याची वेळ ओढवली.
-----
जी पदे रिक्त आहेत, ती जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीच्या माध्यमातून भरली जातात. तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांची ही पदे आहेत. ११ महिन्यांसाठी ही पदे भरली जातात. सध्या फार पदे रिक्त नाहीत. बाधिरीकरण, बालरोगतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ बऱ्याच ठिकाणी आहेत.
- डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक
----
१) जिल्हा रुग्णालय
स्पेशलिस्ट - १९
स्पेशलिस्टची रिक्त पदे - ८
२) उपजिल्हा रुग्णालय
डॉक्टर्स - ४१
रिक्त पदे - ४
३) ग्रामीण रुग्णालये
डॉक्टर्स - ४०
रिक्त पदे - १