औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सायंकाळी १० वाजल्यानंतर ध्वनिक्षेपकाचा वापर करीत मार्गदर्शन केले. त्यांच्या कार्यक्रमांना १० वाजल्यानंतर गर्दी जमविल्याच्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसह आयोजकांवर गुन्हा नोंदविण्याची मागणी करणाऱ्या तक्रारी क्रांतीचौक, वेदांतनगर पोलीस ठाण्यात सामाजिक कार्यकर्त्यांनी नोंदवल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे औरंगाबादच्या दौऱ्यावर रविवारी होते. त्यांनी क्रांतीचौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात रात्री १०.१५ ते ११ वाजण्याच्या दरम्यान व्यासपीठावरून ध्वनिक्षेपकावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी जमावही मोठ्या संख्येने उपस्थित होता. हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह आयोजकांवर गुन्हा नोंदविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते आनंद कस्तुरे यांनी क्रांतीचौक ठाण्याच्या प्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली.
दुसरी तक्रार वेदांतनगर ठाण्यात नोंदविण्यात आली. कोकणवाडी येथे रात्री ११.३० ते १२.३० वाजण्याच्या दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी आयोजकांनी फटाक्यांची आतषबाजी करून ध्वनिक्षेपक वाजविण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही तक्रार सामाजिक कार्यकर्ते मनोज वाहुळ यांनी नोंदवली. या प्रकरणी पोलीस अधिकारी तक्रार अर्जांची चौकशी करीत असल्याचे सांगण्यात आले.