वाळूज महानगर : वाळूज औद्योगिकनगरीत दिवाळीची चाहूल सुरू झाली असून, मोठ्या कंपन्यांच्या वर्क आॅर्डर वेळेत पूर्ण करण्यासाठी लघु उद्योजक सरसावले आहेत. त्यामुळे औद्योगिकनगरीत असलेल्या कारखान्यांतील यंत्रांंची गती वाढली असून, वर्क आॅर्डर पूर्ण करण्यासाठी कामगार व उद्योजकांची धावपळ सुरू आहे.
वाळूज एमआयडीसीत जवळपास ३ हजार लहान-मोठे कारखाने असून, यात जवळपास एक लाख कामगार काम करतात. वाळूज औद्योगिकनगरीतील लघु उद्योजक मोठ्या कंपन्यांचे सब व्हेंडर असून, ते देश-विदेशातील कंपन्यांना लागणारे विविध प्रकारचे स्पेअर पार्ट व साहित्य पुरविण्याचे काम करतात. या कारखान्यांकडून आलेल्या आॅर्डर वेळेत पूर्ण व्हाव्यात, यासाठी लघु उद्योजकांचे प्रयत्न असतात.
दरम्यान, दिवाळीसाठी औद्योगिकनगरीतील बहुतांश अस्थायी, तसेच कायमस्वरूपी कामगार मूळ गावी जातात. कायमस्वरूपी कामगार उत्सवानंतर कामावर परतात; मात्र अस्थायी कामगार दिवाळीच्या सुटी संपल्यानंतर पुन्हा कामावर येत नसल्यामुळे लघु उद्योजकांची तारांबळ उडते.
अशातच गावी गेलेले शेती, तसेच हंगामी रोजगार उपलब्ध झाल्यास अस्थायी कामगार परत येत नाहीत. यामुळे उद्दिष्टपूर्ती करता न आल्यास नुकसान होत असल्याने बहुतांश लघु उद्योजक दिवाळी सणापूर्वीच वर्क आॅर्डर पूर्ण करण्यावर भर देतात. दिवाळी सण तोंडावर आल्यामुळे वर्क आॅर्डरची कामे गतीने सुरू असल्याची माहिती मसिआचे अध्यक्ष किशोर राठी, उपाध्यक्ष ज्ञानदेव राजळे, सचिव गजानन देशमुख, सहसचिव राहुल मोगले, अर्जुन आदमाने, अशोक थोरात, सर्जेराव साळुंके, अर्जुन गायकवाड, अनिल पाटील, पी.के. गायकवाड, विकास पाटील, जगदीश जोशी, मोहन मोरे, अजय गांधी, आशिष नरवडे, अब्दुल शेख, बिजेंद्र सिंग आदींनी दिली.दिवाळीत १५ ते २० टक्के वाढमोठ्या कंपन्यांकडून लघु उद्योजकांना दर महिन्याला स्पेअर पार्टस् व साहित्य पुरविण्याचे उद्दिष्ट दिलेले असते; मात्र दिवाळी सणाच्या काळात १५ ते २० टक्के अधिक वर्क आॅर्डर लघु उद्योजकांना मोठ्या कंपन्यांकडून दिली जाते. राज्यातील पुणे, मुंबईबरोबरच उत्तराखंड व देशातील इतर औद्योगिक क्षेत्रातून आलेल्या वर्क आॅर्डरचे काम वाळूज एमआयडीसीतील लघु उद्योजक करतात. यंदा दिवाळी सणामुळे दर महिन्याच्या तुलनेत १५ ते २० टक्के अधिकचे टार्गेट देण्यात आले असल्याचे राहुल मोगले, अब्दुल शेख या लघु उद्योजकांनी सांगितले.