बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नागपूर-मुंबई समृद्धी एक्स्प्रेस वेसाठी आतापर्यंत ६० शेतक-यांनी शासनाला तीस हेक्टर जमिनीची विक्री केली आहे. या शेतक-यांना आतापर्यंत २६ कोटींचा मोबदला देण्यात आला असून जिल्ह्यात समृद्धी एक्स्प्रेस वेसाठी जमिनी खरेदी प्रक्रियेला आता गती मिळत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी एक्स्प्रेस वेसाठी जिल्ह्यातील २५ गावांमधून जाणार आहे. यासाठी बदनापूर व जालना तालुक्यातील सुमारे १२०० शेतक-यांच्या ५१२ हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. संपादित केल्या जाणा-या जमिनीच्या संयुक्त मोजणीचे काम पूर्ण झाले आहे.सध्या समृद्धीबाधित शेतकºयांच्या शंकांचे निरसन करण्यासह इच्छुक शेतक-यांच्या जमीन खरेदीची प्रक्रिया येथील रस्ते विकास महामंडळाच्या शिबीर कार्यालयामार्फत राबवली जात आहे. गुरुवारी नंदापूर व थार येथील नऊ शेतक-यांच्या तीन हेक्टर ५८ आर जमिनीच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या शेतक-यांना तीन कोटी २३ लाख, ३४९८ रुपयांचा मोबदला देण्यात आला. आतापर्यंत ६० शेतक-यांची तीस हेक्टर १५ आर जमिनीची खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, त्यांना २६ कोटी, २९ लाख २४ हजार ७०३ रुपयांचा मोबदला देण्यात आला आल्याची माहिती रस्ते विकास महामंडळाच्या शिबीर कार्यालयातील तहसीलदार एल.डी. सोनवणे यांनी दिली.दरम्यान, काही गावांमध्ये एकाच गटातील जमिनीच्या दरात तफावत आहे. तसेच जिरायती जमीन बागायती दाखविण्यात आली आहे. यामध्ये सुधारणा करण्यासाठी बाधित शेतक-यांनी शिबीर कार्यालयात अर्जही केले आहेत.शासनाने समृद्धी महामार्गासाठी संपादित केल्या जाणा-या जमिनीस एकसारखा मोबदला द्यावा, या मागणीसाठी शेतकरी हक्क बचाव व कृती समितीच्या पदाधिका-यांनी नुकतीच मुख्यमंत्री फडणवीस व खा. रावसाहेब दानवे यांची मुंबईत भेट घेतली होती. बाधित शेतक-यांची बाजू जाणून घेण्यासाठी बैठक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जमीन खरेदीला आला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 1:24 AM