औरंगाबाद : कोरोना आजाराची लस कधी येईल, हे कोणालाही निश्चित माहीत नाही. शासनाकडून लवकरच कोरोनाची लस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचा गवगवा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शासन आदेशानुसार औरंगाबाद महापालिकेने पहिल्या टप्प्यात शहरातील वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्याचे नियोजन सुरू केले आहे. शहरातील सर्व खासगी रुग्णालयांकडून डॉक्टर्स, नर्स व इतर कर्मचाऱ्यांची (हेल्थ केअर वर्कर्सचा डेटाबेस) माहिती पालिकेने मागवली आहे.
पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनलाही पत्र पाठवले आहे. मागील आठवड्यातच राज्य सरकारने औरंगाबाद पालिकेसह राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना पत्र पाठवून कोरोना लसीकरणाचा आराखडा तयार करून पाठविण्याचे आदेशित केले आहे. शासन नियोजनानुसार सात महिन्यांपासून जीव धोक्यात घालून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना, कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात कोरोनाचे लसीकरण केले जाणार आहे. त्या अनुषंगाने पालिकेकडून शहराच्या वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचा डाटा तयार करण्याचे काम सुरू आहे. वैद्यकीय सेवेत एकूण किती कर्मचारी आहेत, त्यातल्या त्यात कोरोना रुग्णांवरील उपचार सेवेत किती कार्यरत आहेत, याची सर्व माहिती संकलित करून कोरोना लसीकरणासाठी किती व्हॅक्सिनची औरंगाबाद शहराला पहिल्या टप्प्यात गरज आहे, याची सर्व माहिती संकलित केली जाणार आहे. नंतर त्याचा अहवाल व लसीकरणाचा आराखडा शासनाला सादर केला जाणार आहे.
माहिती मागविली आहे त्यामुळे पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी खासगी रुग्णालये, दवाखाने, नर्सिंग होम या आस्थापनांना पत्र पाठवून कोरोना रुग्णांवरील उपचारात कार्यरत डॉक्टर्स, नर्स व इतर कर्मचाऱ्यांची माहिती मागविली आहे. वैद्यकीय सेवेची प्रमुख संस्था इंडियन मेडिकल असोसिएशनलाही हे पत्र पाठविले आहे. पालिकेचे कोविड केअर सेंटर्स, आरोग्य केंद्रे यांचीही माहिती संकलित करून अहवाल तयार केला जात असल्याचे डॉ. पाडळकर यांनी स्पष्ट केले.