औरंगाबाद : पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सुसाट वाहने पळविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वाहनचालकांमुळे अपघाताचा धोका वाढत असल्याचे लक्षात घेऊन वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस आयुक्तांनी शुक्रवारी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. आयुक्तांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार महापालिका हद्दीत आता ताशी ४० किलोमीटर या वेगानेच वाहने चालविता येणार आहेत.
याविषयी वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त एच.एस. भापकर म्हणाले की, ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे असले तरी वाहनचालक मात्र वेगाची मर्यादा पाळताना दिसत नाही. सुसाट वाहनांमुळे रस्ता अपघात होऊन प्राणहाणी होण्याच्या घटना वाढत आहेत. वेगवान वाहनांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्याचा निर्णय शुक्रवारी पोलीस आयुक्तांनी घेतला. यासंदर्भात स्वतंत्र अधिसूचना त्यांनी जारी केली.
या अधिसूचनेनुसार महापालिका हद्दीतील वाहनचालकांना त्यांच्या वाहनांचा वेग ताशी ४० किलोमीटर एवढाच ठेवावा लागेल. त्यापेक्षा अधिक वेगात वाहन चालविणाºयाविरोधात मुंबई पोलीस कायदा कलम १३१ नुसार कारवाई केली जाणार आहे.
अत्यावश्यक सेवेतील वाहनांना सूटअत्यावश्यक सेवेत मोडणाºया रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलीस विभागाच्या वाहनांना मात्र ही वेगमर्यादा लागू होणार नसल्याचे सहायक आयुक्त डॉ. भापकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, अत्यावश्यक सेवेतील वाहनचालकांना कधीकधी ताशी ४० कि.मी.पेक्षा अधिक वेगाने वाहने चालवावी लागतात. ही बाब लक्षात घेऊन अशा वाहनांना वेगमर्यादेची अट लागू करण्यात आली नाही.
अंमलबजावणी कशी होणार...पोलीस आयुक्तांचा वेगमर्यादेवर अंकुश ठेवण्याचा निर्णस स्वागतार्ह आहे; पण सद्य:स्थितीत वाहतूक पोलिसांकडे केवळ एक स्पीडगन उपलब्ध आहे. शहरासह परिसरातील विविध मार्गांवर या निर्णयाची अंमलबजावणी कशी होणार, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.