करमाड (औरंगाबाद ) : चालकाचा अचानक ताबा सुटल्याने कार रस्ता दुभाजक फोडून दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या भरधाव ट्रकला धडकून झालेल्या अपघातात कारमधील एकजण जागीच ठार तर चालक किरकोळ जखमी झाला. दरम्यान, ट्रकच्या पाठीमागील बसच्या चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या खाली घातल्याने 51 प्रवाशांचे प्राण वाचले. हा अपघात शेंद्रा एमआयडीसीच्या कुंभेफळ फाट्याजवळील सोमवारी रात्री अकराच्या सुमारास घडला.
या घटनेत चालकाच्या बाजूला बसलेले कंपनीचे वसुली अधिकारी अमेर उस्मानी (42, जालना) यांचा जागीच मृत्यू झाला तर कार चालक दत्ता मोरे (38, अंबड जिल्हा जालना) यांच्या डोक्याला किरकोळ मार लागुन ते जखमी झाले. सदरील कार (एमएच 21 एएच 6398) ही औरंगाबाद येथून जालन्याकडे चालली होती. शेंद्रा एमआयडीसीच्या कुंभेफळ फाट्यावरून पुढे जाताच लाडगाव उड्डाणपुलाच्या अलीकडे कारचालकाचा गाडीवरील ताबा अचानक सुटला व गाडी थेट चालु रस्त्यावरून रस्तादुभाजक फोडून रस्त्याच्या दुसर्या बाजुला फेकल्या जाऊन ती जालना येथून औरंगाबादच्या दिशेने लोखंडी सळ्या भरून जाणार्या ट्रकला (टीएस 13 व्ही सी 7241) धडकली. यात कारमधील अमेर उस्मानी जागीच ठार झाले.
याचवेळी या ट्रकमागे हिंगोली डेपोची हिंगोली ते पुणे जाणारी बस (एमएच 06 एस 8645) होती. ही बस समोरील सळ्या भरलेल्या ट्रकला धडकणार तोच क्षणाचाही विलंब न करता चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या खाली घातली. बस समोरील कंपाऊंडची सुमारे दहा फुट भिंत फोडत लिंबाच्या झाडाला धडकत बंद पडली. त्यामुळे बसमधील 51 प्रवाशांचे प्राण वाचले. चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.