छत्रपत्री संभाजीनगर: सिडको परिसरात अल्पवयीन दुचाकीचालकाच्या धडकेत ३६ वर्षीय सुवर्णा पंडित या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर सेव्हनहिल उड्डाणपुलाजवळ ४ महिन्यांच्या चिमुकल्याचा रिक्षाचालकाच्या बेजबाबदारपणामुळे मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी समोर आली.
पार्वती सुदाम खुडे (रा. रमानगर) या त्यांच्या चार महिन्यांच्या बाळासह मिनी घाटीत गेल्या होत्या. सकाळी ११ वाजता त्या रिक्षाने घरी परतत असताना बेजबाबदार चालकाच्या अती वेगामुळे रिक्षा एका वाहनाला धडकून पलटली. यात पार्वती गंभीर जखमी होऊन त्यांच्या कुशीत असलेल्या चार महिन्याच्या सुशांतचा मृत्यू झाला. याप्रकरणी रिक्षाचालक (एम एच २० - ई के - ३७९०) वर जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
रागात घर सोडलेल्या विवाहितेचा अपघाती मृत्यूदुसऱ्या एका घटनेत रांजणगाव शेणपुंजी परिसरातील मोनिका मोहन गोरे (३५) या विवाहितेचाही मध्यरात्री अपघाती मृत्यू झाला. गुरुवारी पहाटे ४ वाजता ही घटना उघडकीस आली. मोनिका यांचा पती वाळुंज परिसरात नोकरीस आहे. पतीसोबत वाद झाल्याने त्यांनी बुधवारी रात्री तडकाफडकी घर सोडले. गोलवाडी फाट्याकडून पायी जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यात गंभीर जखमी होत त्या रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर कोसळल्या. छावणी पोलिसांना पहाटे ४ वाजता ही बाब कळाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.