- श्यामकुमार पुरे
सिल्लोड :(जि. औरंगाबाद) सिल्लोड तालुक्यातील मोढा फाट्यावर घाटशेंद्रा येथून लग्न लावून मंगरुळकडे परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला. भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप टेम्पोने रस्त्यावर उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात टेम्पो मधील ६ वऱ्हाडिंचा जागीच मृत्यू झाला तर १४ वऱ्हाडी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास सिल्लोड ते भराडी रस्त्यावर मोढा फाट्यावर झाला.
या अपघातात जागीच ठार झालेल्या इसमाची नावे अशी,जिजाबाई गणपत खेळवणे वय ६० वर्ष, संजय संपत खेळवणे वय ४२ वर्ष, संगीता रतन खेळवणे वय ३५ वर्ष, लक्ष्मीबाई अशोक खेळवणे वय ४५ वर्ष,अशोक संपत खेळवणे वय ५२ वर्ष ,रंजनाबाई संजय खेळवणे वय ४० वर्ष सर्व रा.मंगरूळ असे आहे.
तर अपघातात गंभीर जखमींची नावे : कासाबाई भास्कर खेळवणे वय ४० वर्ष, अजिनाथ शेषराव खेळवणे वय ४५,आकाश रमेश बोर्डे वय १८,ऋषिकेश गोविंदराव आरके वय २०,संतोष गणपत खेळवणे वय३०,धुलाबाई नारायण बोर्डे वय ५०, दुर्गाबाई दत्तात्रय खेळवणे वय ४५, सुलोचना आत्माराम खेळवणे वय ५५ ,गणेश सुखदेव बोर्डे वय १९ वर्ष सर्व रा.मंगरूळ हे ९ प्रवाशी गंभीर जखमी झाले त्यांना पुढील उपचार साठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले तर सार्थक अजिनाथ खेळवणे वय ८ वर्ष, ओमकार रतन खेळवणे वय १६, कलाबाई बाबू म्हस्के वय ५० वर्ष, सुभाष राजेश खेळवणे वय ४५, सुरेश विठल खेळवणे वय ५० वर्ष या पांच लोकांवर सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
झोपेमुळे वाहनावरील नियंत्रण सुटले :
मंगरूळ येथील शिवराम मुकुंदा खेळवणे यांचा बुधवारी संध्याकाळी घाटशेंद्रा येथे विवाह होता.ते लग्न लावून रात्री ही वऱ्हाडी मंडळी परत मंगरूळ येथे येत होती.झोपेच्या नादात वाहणावरील नियंत्रण सुटून पिकअप ( क्रमांक एम एच २० सी टी -२९८१) हा रस्त्याच्या कडेला ऊस भरून नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर ला जाऊन धडकला.अपघात इतका भीषण होता की पिकअप चे तुकडे तुकडे झाले.अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे, फौजदार विकास आढे, लक्ष्मण कीर्तने, अनंत जोशी व कर्मचाऱ्यानी घटनास्थळी धाव घेतली लोकांच्या मदतीने जखमी व मृतांना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
मृतांमध्ये दोन पती पत्नी ठार..या अपघातात एकाच कुटुंबातील व नवरदेवाचे चुलते काका काकू रंजनाबाई संजय खेळवणे व संजय संपत खेळवणे , लक्ष्मीबाई अशोक खेळवणे व अशोक संपत खेळवणे हे दोघे पती पत्नी जागीच ठार झाले. या घटनेमुळे तालुका हादरला आहे.