औरंगाबाद : स्वस्तधान्य दुकानदारांना धान्याचा पुरवठा करणाऱ्या मालवाहू ट्रकने विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना केम्ब्रीज चौक ते सावंगी वळण रस्त्यावरील गोपाळपूर फाट्याजवळ बुधवारी(दि.१९)रोजी सायंकाळी घडली.
रामेश्वर जगदाळे (२६, ह.मु. मयूर पार्क , मूळ रा.कोलठाणवाडी)असे मृताचे नाव आहे. या अपघाताविषयी प्राप्त माहिती अशी की, रामेश्वर हा नातेवाईकांच्या कन्स्ट्रक्शन साईटवर देखरेखीचे काम करायचा. बुधवारी सकाळी त्याने मित्रांसह शिवजयंती साजरी केली. दुचाकीला भगवा झेंडाही बांधला होता. यानंतर तो सायंकाळी कामानिमित्त केम्ब्रीज चौकाकडे गेला होता. तेथील काम आटोपून सायंकाळी साडेपाच पावणे सहा वाजेच्या सुमारास रामेश्वर मोटारसायकलने केम्ब्रीज चौकाकडून सावंगी बायपासने जात होता.
गोपाळपुर फाट्याजवळ तो असताना विरुद्ध दिशेने आलेल्या स्वस्त-धान्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकने त्याला उडवले. या घटनेत ट्रकच्या चाकाखाली आल्याने रामेश्वर गंभीर जखमी होऊन घटनास्थळी बेशुद्ध पडला. या अपघाताची माहिती मिळताच चिकलठाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बेशुद्धावस्थेत रामेश्वरला घाटीत दाखल करण्यात आले. अपघात विभागातील डॉक्टरांनी रामेश्वरला तपासून मृत घोषित केले. या अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी घाटीत धाव घेतली. चिकलठाणा पोलिसांनी तरूणाला उडविणारा ट्रक जप्त केला. चालकाला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. चिकलठाणा ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली.