चिकलठाण : यंदा पाणी असल्यामुळे उत्पन्न चांगले मिळेल, या आशेने टरबूज लागवड करून त्यावर ठाकूरवाडी येथील शेतकरी राजाराम लहानू मधे यांनी ७० हजार रुपये खर्च केला. पीकही चांगले आले. मात्र, आता ही टरबुजाची वाडी व्यापाऱ्यांनी केवळ १५ हजार रुपयांत मागितल्याने मधे यांच्या डोळ्यात पाणी येऊन ते नि:शब्द झाले. ही अवस्था सर्वच टरबूज उत्पादक शेतकऱ्यांची सध्या झालेली दिसत आहे.
ठाकूरवाडी वस्ती येथील शेतकरी राजाराम मधे यांनी त्यांच्या शेतात गट नंबर १११ मध्ये सुधारित जातीच्या टरबुजांची ३० गुंठ्यांमध्ये लागवड केली. उत्पादन चांगले मिळावे, यासाठी त्यांनी नांगरणी, बेड, ठिबक, शेणखत, रासायनिक खते, कीटकनाशक औषधी, बियाणे, मजुरी, असा सर्व खर्च ७० हजार रुपयांपर्यंत केला, तसेच रात्रंदिवस मेहनत केल्यामुळे पीकही चांगले येऊन एक- एक टरबूज पाच ते आठ किलोचे झाले आहे. आतून संपूर्ण लाल व अवीट गोड असल्याने किमान दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळेल, अशी मधे यांना आशा होती. मात्र, कोरोनामुळे आलेल्या निर्बंधांमुळे टरबूज विक्रीसाठी येत असलेल्या अडचणी, तसेच व्यापाऱ्यांकडून मातीमोल भावात मागणी होत असल्याने मधे नैराश्यात गेले आहेत. व्यापारी शेतात येतात व १५ हजार रुपयांपर्यंतच संपूर्ण टरबुजाची वाडी मागत असल्याने मधे नि:शब्द होत आहेत. काय करावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. किमान खर्च जरी निघाला तरी पुरे, असे त्यांना वाटत आहे. मात्र, सुलतानी संकटामुळे ते मेटाकुटीला आले आहेत. हीच परिस्थिती तालुक्यातील सर्वच टरबूज उत्पादक शेतकऱ्यांची सध्या झाली असून, गोड टरबुजांनी शेतकऱ्यांना रडविलेे आहे.
कोट
कर्ज कसे फेडू, टरबूज शेतीने मला कंगाल केले
मी रोजमजुरी करून आलेले सर्व पैसे, तसेच कर्ज काढून हे सर्व पैसे मी टरबूज शेतीत टाकले. मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे. आज रोजी माझ्यावर ५० हजार रुपयांचे कर्ज आहे. लाखमोलाच्या टरबूजवाडीत सध्या आठ टनांपर्यंत माल आहे. मात्र, संपूर्ण टरबूजवाडी केवळ १५ हजार रुपयांना व्यापारी मागत आहेत. माझा खर्चच ७० हजार रुपये झाला आहे. एवढ्या मातीमोल भावात जर टरबूज जात असतील, तर कर्ज कसे फेडू. स्वप्न बघितले, त्यावर कुटुंबाच्या गरजा भागतील असे वाटले. मात्र, ही टरबूजवाडी मला कंगाल करून सोडेल, याची कल्पना नव्हती. जगावे कसे हा प्रश्न आहे.
-राजाराम लहानू मधे, शेतकरी, ठाकूरवाडी
फोटो : टरबूज शेतीत टरबूज दाखविताना शेतकरी मधे.
120521\001520210509_115845_1.jpg
टरबूज शेतीत टरबूज दाखविताना शेतकरी मधे दिसत आहेत.