लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नारायण सेवा संस्थान, उदयपूर यांच्या वतीने अपंग, वृद्ध व निराधार यांच्यासाठी जालन्यात रविवारी सायंकाळी पाच वाजता आत्मीय स्नेहसंमेलनाचे आयोजन केल्याची माहिती अंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रशांत अग्रवाल यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. हे स्नेहसंमेलन भोकरदन नाका स्थित, आयएमए हॉल येथे होणार आहे. नारायण सेवा संस्थान अपंग, अनाथ, निराधार, गरीब, वृद्ध तसेच वंचितांसाठी कार्य करते. प्रशांत अग्रवाल म्हणाले की, नारायण सेवा संस्थानची स्थापना कैलाश मानव यांनी १९८५ मध्ये केली. मानव यांनी गावातून मिळेल ते अन्न एकत्र करून ते भुकेलेल्यांना दिले. त्यासाठी एक अभियानच राबविले. प्रारंभी कुटुंबातील सदस्य आणि निवडक मित्र या अभियानात होते. आज सुमारे एक हजार सदस्य या अभियानात कार्यरत असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. संस्थानच्या वतीने दररोज शंभर गरीब अपंगांवर शस्त्रक्रिया केल्या जातात. सोबतच औषधी, निवास तसेच नातवाईकांची भोजन व्यवस्थाही करण्यात येते. संस्थानच्या वतीने आतापर्यंत सुमारे ३ लाख ५ हजार शस्त्रक्रिया करण्यात आल्या. निराधार, वृद्ध यांना स्वस्त धान्य देण्याचे काम संस्थान करत आहे. सोबतच निराधार तसेच आर्थिक दुर्बल घटकांना शिलाई, संगणक, मोबाईल रिपेरिंग इ.चे रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले जात आहे. त्यांनी अशा लोकांना स्वत:च्या पायावर उभे केले आहे. संस्थानच्या वतीने गोरगरिबांसाठी सामूहिक सोहळ्याचेही आयोजन करते. संस्थानच्या वतीने बालगृहे, वसतिगृहे चालविली जातात. त्यांना आवश्यक ते शिक्षण दिले जाते. अग्रवाल यांनी जालनेकरांना आवाहन केले असून, या स्नेहसंमेलनात नागरिकांनी उपस्थित रहावे, संस्थानचे कार्य व राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घ्यावी. यावेळी नारायण सेवा संस्थानचे विविध पदाधिकारी तसेच स्थानिक शाखेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
नारायण सेवा संस्थानचे आत्मीय स्रेहसंमेलन
By admin | Published: May 07, 2017 12:15 AM