व्ही़एस़ कुलकर्णी ल्ल उदगीरपावसाळ्याच्या तोंडावर आता प्रशासनाकडून वृक्षलागवडीची लगीनघाई सुरु झाली आहे़ परंतु, प्रत्यक्षात उदगीर तालुक्यात मात्र या लागवडीला खो मिळण्याची शक्यता आहे़ तालुक्यात केवळ ५ ठिकाणीच रोपवाटिका कार्यान्वित आहेत़ त्यात केवळ ८० हजार रोपं उपलब्ध आहेत़ परंतु, उन्हाळ्यात या रोपांना पाणीच उपलब्ध न झाल्याने त्यांची वाढ खुंटली आहे़ ज्यामुळे ही रोपं सध्यातरी लागवडीयोग्य उरली नाहीत़ सततचा दुष्काळ अन् कमी झालेले वनक्षेत्र या पार्श्वभूमीवर उदगीर तालुक्यात यंदा वृक्षलागवडीचे काम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात येत आहे़ त्यासाठीची जोरदार तयारीही आतापासूनच विविध शासकीय यंत्रणामार्फत सुरु झाली आहे़ जूनच्या पहिल्या आठवड्यात वृक्षलागवडीचा श्रीगणेशा होणार आहे़ तालुक्यात केवळ सामाजिक वनीकरणाची एकच रोपवाटिका आहे़ तर वनविभागाच्या ४ रोपवाटिका अस्तित्वात आहेत़ सामाजिक वनीकरणची वाटिका निडेबन येथे अस्तित्वात असून तेथे केवळ ५ हजार रोपं उपलब्ध आहेत़ तर वनविभागाच्या हत्तीबेट, डिग्रस, हकनकवाडी व वायगाव येथील वाटिकेत एकूण ७० ते ७५ हजार रोपं आहेत़ मात्र, यंदा भीषण पाणीटंचाईची झळ या रोपवाटिकांनाही बसली आहे़ पुरेसे पाणी उपलब्ध न झाल्याने रोपवाटिकेतील रोपांची वाढ चांगलीच खुंटली आहे़ त्यामुळे रोपांची उंची अगदी चार बोट ते एक वीत पर्यंतच झाली आहे़ ज्यामुळे या रोपांची लागवड करणे कठीण झाले आहे़यावर्षी जलयुक्तची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहे़ त्याच्या दुतर्फा बांधावर वृक्ष लागवड होणार आहे़ तसेच रस्त्यांच्या दुतर्फा, गायरान जमिनी, सार्वजनिक जागांवरही लागवड होणार आहे़ या लागवडीसाठी यंदा प्रथमच लोकसहभाग आजमावण्यात येणार आहे़ त्यासाठी ग्रामस्थांसोबतच शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनांचे स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे़ त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात रोपांची आवश्यकता भासणार आहे़ परंतु, सध्या ते उदगीर तालुक्यात उपलब्ध नाहीत़ त्यामुळे यावर्षी बाहेर राज्यातून रोपे मागविण्यात येवू लागली आहेत़ वनविभागाने आंध्रप्रदेशातील राजमहेंद्री येथून २० हजार रोपांची बुकिंग केली आहे़ तेथेही यावर्षी मोठ्या प्रमाणात मागणी आल्याने रोपांची कमतरता भासत आहे़ मात्र, वनविभागाने आगाऊ नोंदणी करुन रोपे मिळविली आहेत़ ती जूनच्या पहिल्या आठवड्यात तालुक्यात दाखल होणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण पाटील यांनी सांगितले़
रोपं नसतानाही लागवडीची लगीनघाई
By admin | Published: May 31, 2016 11:19 PM