लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील ५० हजार पथदिव्यांना एलईडी दिवे बसविण्यासाठी महापालिकेने दिल्ली येथील एका खाजगी कंपनीला कंत्राट दिले आहे. या कंपनीने प्रत्यक्षात कामही सुरू केले असताना महापालिका प्रशासन स्वखर्चातून प्रत्येक वॉर्डात एलईडी दिवे बसवीत आहे. एलईडी दिवे बसविण्यासाठी नगरसेवकांमध्ये अक्षरश: स्पर्धा सुरू झाली असून, आतापर्यंत दहापेक्षा अधिक वॉर्डांमध्ये हे दिवे बसवून कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात आला आहे.महापालिकेचा विद्युत विभाग म्हणजे कंत्राटदारांसाठी सध्या कुरण ठरत आहे. वॉर्डातील पथदिव्यांची दुरुस्ती, एलईडी दिवे बसविण्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. सर्व कंत्राटदार चायना मेड साहित्याचा वापर करून मनपाला जोरदार चुना लावत आहेत. कंत्राटदारांनी आणलेल्या साहित्याची तपासणी करणार कोण? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्प अद्याप प्रशासनाच्या हाती पडलेले नाही. त्यापूर्वीच अर्थसंकल्पातील कामांनाही सुरुवात झाली आहे. यामध्ये विद्युत विभाग सर्वात आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. या विभागातील अधिका-यांची ११४ नगरसेवक तक्रार करतात. मात्र, त्यांची बदली करा असा आग्रह कोणीच धरत नाही. त्यांची क्षमता नसतानाही त्यांना मागील अनेक वर्षांपासून विद्युत विभागात ठेवण्यात आले आहे. या अधिकाºयांचे एकानंतर एक प्रताप आता चव्हाट्यावर येत आहेत.मनपा प्रशासनाने शहरातील संपूर्ण पथदिव्यांना एलईडी दिवे लावण्यासाठी कंत्राट दिलेले असताना विद्युत विभागाचे अधिकारी राजरोसपणे विविध वॉर्डांमध्ये स्वखर्चाने एलईडी दिवे लावत आहेत. या कामांवर आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेने केलेला खर्च वाया जाणार हे निश्चित. कारण एलईडीचा कंत्राटदार केबल बदलणे, नवीन लाईन लावणे आदी कामे करणार आहे.पथदिव्यांची दहा वर्षे देखभाल दुरुस्तीही याच मोठ्या कंत्राटदाराकडे सोपविण्यात आली आहे. या कंत्राटदाराला शह देण्यासाठी मनपातील छोटे-छोटे कंत्राटदार नगरसेवकांकडे एलईडी दिवे लावण्यासाठी आग्रह धरीत आहेत. चायना मेड दिवे लावून मोठी कमाई कंत्राटदार करीत आहेत. त्यात नगरसेवकांना मोठा वाटा देण्यात येत असल्याची चर्चा आता मनपा वर्तुळात रंगत आहे. अनेक नगरसेवक अधिकाºयांकडे एलईडी दिवे लावण्याचा आग्रह धरीत आहेत.
एलईडीच्या नावावर उधळपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 12:39 AM