औरंगाबाद : नवजीवन सोसायटीतर्फे रविवारी झालेल्या दिव्यांग रनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंतरराष्ट्रीय खेळाडू सागर बडवे, दर्शन क्षीरसागर व आ. अतुल सावे यांच्या उपस्थितीत स. भु. येथून सकाळी ७ वाजता सुरू झालेली ३ कि. मी. अंतराची ही दिव्यांग रन मतिमंद, अंध, अस्थिव्यंग व कर्णबधिर या चार गटांत झाली. या गटातील सर्वच धावपटूंनी निर्धारित अंतर जिद्दीने पूर्ण केले.दिव्यांग धावपटूंसोबत एक व्यक्ती, महिला हात धरून उत्स्फूर्तपणे धावत होत्या. विशेष म्हणजे औरंगाबादेतील मॅरेथॉनमध्ये नियमीत सहभागी दिग्गजांनीही दिव्यांग रनमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. या धावपटूंचा रस्त्यात उभ्या असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी उत्साह वाढवला. दिव्यांग रन सुरू होणाºया आधी फिटनेस एक्स्पर्ट प्रीती भानुशाली यांच्या नेतृत्वाखालील रिलॅक्स झीलने नृत्य व संगीततालाच्या नादात धावपटूंकडून वार्मअप करून घेत उत्साह वाढवला आणि त्यानंतर त्यांच्याकडून स्ट्रेचिंगही करून घेतले.याप्रसंगी रिलॅक्स झीलचे संचालक संजय पाटीलदेखील उपस्थित होते. विशेष म्हणजे या धावपटूंसाठी मोफत रेखा हिवरे यांच्यातर्फे नाश्ता ठेवण्यात आला होता, तर औरंगाबाद ब्लॅक बक्सतर्फे पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ही दिव्यांग रन यशस्वी करण्यासाठी नवजीवन सोसायटीच्या संचालिका शर्मिष्ठा गांधी, अध्यक्ष नलिनी शाह, सचिव रामदास अंबुलगेकर, जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे सचिव फुलचंद सलामपुरे, विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक डॉ. दयानंद कांबळे, अभिजित जोशी, अंजली वळसंगकर, नीला रहाणे, सुनंदा पाटील, चित्रा सुरडकर, प्रमोद माटे, तुकाराम कुबडे यांच्यासह शशी शिनगारे, सचिन देशमुख, मधुकर वाकळे, राम जाधव, पूनम राठोड, राहुल नरवडे, गौतम शिरसाठ, विशाल देशपांडे, राहुल अहिरे आदींनी परिश्रम घेतले.
दिव्यांग रनला उत्स्फूर्त प्रतिसाद, जिद्दीने केले अंतर पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 1:00 AM