औरंगाबाद : एका संस्थेला अनुदानाचा धनादेश देण्यासाठी साडेतीन हजारांची लाच स्वीकारताना औरंगाबाद क्रीडा कार्यालयातील क्रीडा अधिकारी नारायण नाथुजी धंदर (५०, रा. दिशा घरकुल, देवळाई परिसर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई सोमवारी दुपारी क्रीडा कार्यालयात झाली.कारवाईबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीची महिला जनकल्याण प्रतिष्ठान नावाची संस्था आहे. या संस्थेला युवक कल्याणविषयक उपक्रमांच्या आयोजनासाठी आर्थिक साहाय्य मिळावे, यासाठी गतवर्षी जिल्हा क्रीडा कार्यालयात प्रस्ताव दाखल करण्यात आलेला होता. त्यानुसार संस्थेला नुकतेच २५ हजारांचे अनुदान मंजूर झाले. दरम्यान, २ एप्रिल रोजी कार्यालयातील क्रीडा अधिकारी धंदर याने फिर्यादीला फोन केला आणि कार्यालयात येण्याचे सांगितले. त्यानुसार फिर्यादी आला. तेव्हा धंदरने ‘तुमचा २५ हजार रुपये अनुदानाचा धनादेश तयार आहे’ असे सांगून हा धनादेश देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली. लाचेची रक्कम दिल्याशिवाय धनादेश देण्यास त्याने नकार दिला. शेवटी वैतागलेल्या फिर्यादीने सरळ लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय गाठले आणि धंदरविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार त्याला रंगेहाथ पकडण्याची योजना आखण्यात आली. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने धंदरला पुन्हा संपर्क केला. तेव्हा सोमवारी पैसे देण्याचे ठरले. त्यानुसार लाचलुचपतच्या पथकाने क्रीडा अधिकारी कार्यालयात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे फिर्यादी दुपारी पावणेदोन वाजता कार्यालयात आला. धंदरला भेटले. तेव्हा त्याने धनादेश देण्यासाठी पाच हजारांची मागणी केली. तडजोडीअंती साडेतीन हजार रुपयांवर सौदा ठरला. हे साडेतीन हजार रुपये धंदरने फिर्यादीकडून स्वीकारताच बाजूलाच दबा धरून बसलेल्या लाचलुचपतच्या पोलिसांनी झडप मारून त्याला रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध बेगमपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
क्रीडा अधिकारी लाच घेताना अटकेत
By admin | Published: April 05, 2016 12:32 AM