करमाड पोलीस ठाणे : तीन महिन्यांपूर्वी शेंद्रा एमआयडीसीमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने झाला होता मृत्यू, मारहाणीनंतर मृत्यू झाल्याचाा नातेवाईकांनी आरोप करून एस.पी. कार्यालयासमोर केले आंदोलनऔरंगाबाद : तीन महिन्यांपूर्वी शेंद्रा जहांगीर येथील दिनकर कचकुरे यांच्या मृत्यूप्रकरणी संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी बुधवारी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन सुरू करताच अप्पर पोलीस अधीक्षकांनी आंदोलनाची दखल घेऊन याप्रकरणी संशयितांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्याचे आदेश करमाड पोलिसांना दिले. पोलिसांनी दोन संशयिताना ताब्यात घेतले.
शेंद्रा जहांगीर येथील रहिवासी दिनकर कचकुरे हे ७ जानेवारी रोजी संशयित आरोपी दत्तात्रय जाधव आणि जनार्दन जाधव यांच्यासोबत शेंद्रा एमआयडीसीमध्ये दारू पिण्यासाठी गेले होते. हॉटेलमध्ये दारूची पार्टी सुरू असताना त्यांच्यात काही तरी कारणावरून वाद झाला. यावेळी दत्तात्रय आणि जनार्दन यांनी दिनकर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मात्र शवविच्छेदन अहवालामध्ये दिनकर यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटका आल्याने झाल्याचा अहवाल पोलिसांना मिळाला होता. परिणामी पोलिसांनी या घटनेत संशयितांविरोधात गुन्हा नोंदविला नव्हता. मृताच्या नातेवाईकांकडून मात्र खुनाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी पोलिसांकडे केली होती. करमाड पोलीस खुनाचा गुन्हा नोंदविण्यास नकार देत होते. या पार्श्वभूमीवर मृत दिनकर यांच्या नातेवाईकांनी बुधवारी पोलीस अधीक्षक कार्यालयास निवेदन देऊन आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. ही बाब गांभीर्याने घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान सकाळी ११ वाजेच्या सुमारास दिनकर यांचे नातेवाईक आंदोलन करण्यासाठी अधीक्षक कार्यालयात आले. त्यांनी आंदोलन सुरू करताच अप्पर अधीक्षक गणेश गावडे, उपअधीक्षक विशाल मेहुल, गुन्हे शाखेचे निरीक्षक सुभाष भुजंग, विशेष शाखेचे निरीक्षक मुकुंद आघाव यांनी आंदोलकांसोबत चर्चा केली. या प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंद होऊ शकत नाही, हे स्पष्ट करीत याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविणे शक्य असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे यांनी सांगितले. त्यानंतर करमाड ठाण्याचे निरीक्षक रायकर यांना फोन करून या गुन्ह्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले.
करमाड पोलिसांनी केली संशयिताना अटकवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून आदेश प्राप्त होताच करमाड पोलिसांनी लगेच आरोपींविरोधात भादंवि कलम ३०४ अन्वये गुन्हा नोंदविला. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही संशयिताना ताब्यात घेतले. ही बाब आंदोलकांना सांगितल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे पोलिसांना सांगितले.