औरंगाबाद : महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराच्या वैभवात आणखी भर घालणारा भव्यदिव्य श्रीरामकृष्ण ध्यान मंदिराचा लोकार्पण सोहळा १७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यानिमित्त १६ ते १८ हे तीन दिवस आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त आयोजित पत्रपरिषदेत श्रीरामकृष्ण मिशन आश्रमाचे प्रमुख स्वामी विष्णुपादानंद यांनी सांगितले की, जगाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक इतिहासात श्रीरामकृष्ण परमहंस हे अद्वितीय धर्म समन्वयक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपले संपूर्ण जीवन मानवमात्रांच्या शांततेसाठी आणि कल्याणासाठी वेचले. त्यांचे प्रमुख शिष्य स्वामी विवेकानंद यांनी आपल्या गुरूचा अमर संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविला. या ध्यान मंदिरात श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.
१६ ते १८ नोव्हेंबर हे तीन दिवस सोहळा होणार असून, १७ रोजी मुख्य लोकार्पण सोहळ्याला सकाळी ९ वाजता सुरुवात होईल. यात बेलूर येथील रामकृष्ण मठाचे ३ वरिष्ठ उपाध्यक्ष स्वामी वागिशानंद महाराज, स्वामी गौतमानंद महाराज आणि स्वामी शिवमयानंद महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच सरचिटणीस स्वामी बलभद्रानंद महाराज व देश-विदेशातून आलेल्या ३५० साधूंची तसेच महापौर नंदकुमार घोडेले यांचीही व्यासपीठावर उपस्थिती राहणार आहे. सुमारे ५ हजार भाविक या तीनदिवसीय सोहळ्यात सहभागी होतील. ४० ज्येष्ठ साधूंची व्याख्याने होणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
१६ रोजी स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील प्रेरक घटना, साहित्यातले उतारे, वचने नाट्यरूपात सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर ‘संन्यासीचे विवेकानंद चरित्र चिंतन’ विषयावरील व्याख्यान व स्वामी विवेकानंदांच्या जीवनावरील नाटक सादर करण्यात येणार आहे. १७ रोजी सायंकाळी ‘महाराष्ट्राची अद्वैत भक्ती आणि शौर्य परंपरा’ विषयावरील नाटिका व १८ रोजी ‘रामकृष्ण भक्त संमेलन’, ‘भक्तवत्सल श्रीरामकृष्ण’ या विषयांसह विविध कार्यक्रमांनी सोहळ्याची सांगता होणार आहे.
भव्य मंडपाची उभारणीश्रीरामकृष्ण ध्यान मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मंदिराच्या बाजूला असलेल्या ७ एकर जागेवर ३५० फूट लांब व १४० फूट रूंद तसेच २४ फूट उंचीचा भव्य मंडप उभारण्यात आला आहे. सुमारे ५ हजारपेक्षा अधिक भाविक येथे बसतील. बीड बायपास रस्त्यावरील श्रीरामकृष्ण मिशन आश्रमाच्या वतीने उभारण्यात आलेली हे श्रीरामकृष्ण ध्यान मंदिराची भव्य वास्तू आकर्षण ठरत आहे.