औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल ९२.१० टक्के लागला आहे. विभागात औरंगाबाद जिल्ह्याला दुसरा क्रमांक मिळाला आहे, तर प्रथम क्रमांक जालना जिल्ह्याने पटकावला आहे. जिल्ह्याच्या निकालात मुलींची आघाडी कायम आहे.
औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील दहावीला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल विभागीय सचिवांनी बुधवारी दुपारी जाहीर केला. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेसाठी ६४ हजार ८७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ६४ हजार ६२८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ५९ हजार ५२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.१० एवढी आहे. जिल्ह्यात परीक्षा दिलेल्या ६४ हजार ६२८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ३५ हजार ५११ मुले आणि २९ हजार ११७ मुलींचा समावेश आहे. त्यापैकी ३१ हजार ८६० मुले, तर २७ हजार ६६३ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.७२ आहे, तर मुलींची ९५.१ एवढी आहे. मुलांच्या तुलनेत ५.२९ टक्के मुली अधिक उत्तीर्ण झाल्या आहेत. पुनर्परीक्षार्थींमध्ये ४ हजार ८७९ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ३५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ही टक्केवारी ६८.८३ एवढी आहे.
१९००० हजार विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्णऔरंगाबाद जिल्ह्यात एकूण ५९ हजार ५२३ विद्यार्थ्यांपैकी तब्बल १९ हजार ६१५ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेत प्रावीण्य श्रेणी पटकावली. २१ हजार ३११ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणीत १४ हजार ६०९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे, तर ३ हजार ९८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. औरंगाबाद विभागात ५२ हजार ७७७ विद्यार्थ्यांनी प्रावीण्य श्रेणी मिळविली आहे.
कमी नव्हे, खरा निकाल लागला औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल कमी लागला असेल; पण तो खरा निकाल आहे. खोट्या निकालाची विद्यार्थ्यांना गरज नाही. परीक्षेत गैरप्रकार करून निकाल वाढवला जात होता. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यात राबविलेल्या कॉपीमुक्त मोहिमेमुळे निकाल कमी लागला असेल; पण विद्यार्थ्यांची ही खरी गुणवत्ता आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात खऱ्या निकालाची आवश्यकता आहे. त्यात औरंगाबाद जिल्हा आघाडीवर आहे, अशी प्रतिक्रिया माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी दिली.