औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत कोकण विभागाने ९८.७७ टक्के निकालाची नोंदवत आघाडी कायम राखली. औरंगाबाद विभागाचा निकाल ९२ टक्के लागला असून, राज्यात शेवटचा क्रमांक मिळाला. तरीही मागील वर्षीच्या तुलनेत विभागाचा निकाल १६.८० टक्के अधिक लागला. बुधवारी औरंगाबाद विभागाचा निकाल विभागीय मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी जाहीर केला. यावेळी सहसचिव विजय जोशी, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण उपस्थित होते.
औरंगाबाद विभागात २ हजार ५६० माध्यमिक शाळांमधील १ लाख ८५ हजार ९३५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यात १ लाख ८४ हजार ७६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १ लाख ६९ हजार ९९१ जण उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी ९२ आहे. १५ हजार ९४६ विद्यार्थी पुनर्परीक्षार्थी होते. त्यापैकी १५ हजार ७६० जणांनी परीक्षा दिली. त्यात १०, ९२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुनर्परीक्षार्थीच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ६९.३४ आहे.
६२४ केंद्रावर परीक्षाविभागात दहावीची परीक्षा ६२४ केंद्रावर झाली. यासाठी ६३ परीक्षक, ६२४ केंद्र संचालक आणि सहकेंद्रसंचालक, ११ हजार २३१ पर्यवक्षकांनी कार्य केले होते. परीक्षेच्या कालावधीत पाच जिल्ह्यांत एकूण १८१ गैरप्रकार घडले होते. त्यापैकी ७० गैरप्रकारांच्या चौकशीची प्रक्रिया पूर्ण झालेली असून, त्यातील ६९ जणांच्या विषयाची संपादणूक रद्द करण्यात आली. दहावीच्या निकालात कोणत्याही विशिष्ट विषयात संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांची छायाप्रत पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागीय मंडळाकडे आॅनलाईन पद्धतीने करता येईल, असेही सचिव सुगता पुन्ने यांनी सांगितले.