औरंगाबाद : एसटी बस येताच आतमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची धावपळ... फलाटावर बसच्या प्रतीक्षेत थांबलेले प्रवासी... तब्बल अडीच महिन्यांनंतर सोमवारी मध्यवर्ती बसस्थानकात हे दृश्य पाहायला मिळाले. राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेला पहिल्याच दिवशी प्रवाशांनी प्रतिसाद दिला. औरंगाबाद जिल्ह्यात दिवसभरात १८५ एसटी धावल्या. यातून ५ हजार प्रवाशांनी प्रवास केला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अडीच महिन्यांपासून एसटी बससेवा केवळ अत्यावश्यक सेवेसाठी धावत होती; परंतु अखेर निर्बंध कमी होताच पुन्हा एकदा ‘एसटी’ची चाके सर्वसामान्यांसाठी गतिमान झाली आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून पुण्यासह विविध मार्गांवर बस सोडण्यात आल्या. सिडको बसस्थानकातून बीड, जालना, अकोला, नांदेड, पुसद, रिसोड, चिखली, वाशिम, यवतमाळ, मेहकर, नागपूर आदी मार्गांवर पहिल्या दिवशी ३८ बस धावल्या, अशी माहिती सिडको बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक लक्ष्मण लोखंडे यांनी दिली. प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नसल्याने पहिल्याच दिवशी बसला प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली. अनेक मार्गांवरील बस पूर्ण आसन क्षमतेने धावल्या.
कोरोना नियमांचे पालनपहिल्या दिवशी १८५ बस धावला. यातून जवळपास ५ हजार प्रवाशांनी प्रवास केला. प्रवासी सेवा देताना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले जात आहे. बसचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. प्रवाशांना मास्क लावणे बंधनकारक आहे. पहिल्या दिवशी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला.- अरुण सिया, विभाग नियंत्रक