दुधड (छत्रपती संभाजीनगर) : एसटी महामंडळाने छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसावंगी येथे पूर्वी येत असलेली मुक्कामी बस कोरोनानंतर बंद केल्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी करमाड येथे जाण्यासाठी गैरसोय होत आहे. महामंडळाची बस बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज ५ किमीची पायपीट करावी लागत आहे.
एकीकडे शासन मुलींचा शिक्षणातील कल वाढावा म्हणून विविध योजना आणत आहे, तर दुसरीकडे ग्रामीण भागातील मुला -मुलींना शाळेपर्यंत जाण्यासाठी ५ किमीची अशी पायपीट होत आहे. एसटी महामंडळाने बंद केलेली बस पूर्ववत करावी, अशी मागणी विद्यार्थी व पालकवर्गातून होत आहे.
खासगी वाहनाने जीवघेणा प्रवासदुधड, भांबर्डा, जयपूर, बनगाव, गेवराई कुबेर, पिंपळखुटा, मुरूमखेडा, लाडसावंगी येथील विद्यार्थ्यांना उच्च व माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी दररोज करमाड येथे जावे लागते. विद्यार्थ्यांना कधी कधी खासगी वाहनातून प्रवास करावा लागतो. खासगी वाहनचालक विद्यार्थ्यांकडून जास्तीचे भाडे घेत असल्याने पालकांना भुर्दंडाला सामोरे जावे लागत आहे. प्रवासी अधिक भरून मुलांना दमकोंडीत प्रवास करावा लागतो. दररोज दोन तास अगोदर बसस्थानकावर येऊन बसण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे.