लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : २५ ते ३० वर्षे जुनाट तंत्रज्ञान व यंत्रांच्या साह्याने आजही एसटी महामंडळाची बसबांधणी होत आहे. या तंत्रज्ञानाने एक एसटी बांधण्यासाठी सध्या ९०० तास लागत असताना, ‘कर्मचाºयांनो कार्यक्षमता वाढवा,’ असे सांगत हेच काम जवळपास ७०० तासांत करण्याचे फर्मान एसटीच्या कारभाºयांनी सोडले आहे. त्यामुळे कामगारांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेची स्थापना १९७६ मध्ये झाली. १९८० मध्ये बसबांधणीचे तास ठरविण्यात आले. यानुसार सुरुवातीला एक एसटी (लाल बस) बांधणीला २२०० श्रमिक तास होते. कार्यशाळेला ९० च्या दशकात काही यंत्रसामग्री प्राप्त झाली. श्रमिक तास वेळोवेळी कमी करण्यात आले. त्यानंतर २००८ ते २०१२ आणि २०१२ ते २०१६ च्या करारामध्ये प्रत्येकी २०० श्रमिक तास कमी करण्यात आले. २०१२ पर्यंत एका बसबांधणीसाठी ११७२ तास देण्यात आले होते. हे तास ९७२ करण्यात आले. कमी करण्यात आलेल्या तासांच्या मोबदल्यात कार्यशाळेतील कामगारांची कार्यक्षमता वाढविणारी आधुनिक यंत्रसामग्री घेण्याचे मान्य करण्यात आले होते; परंतु अद्यापही जुनाट यंत्रांनीच बसबांधणी होतआहे.आता पुन्हा जवळपास २०० श्रमिक तास कमी होणार असून, कमी वेळेत अधिक बसगाड्यांची बांधणी करावी लागणार आहे. यानुसार नव्या बसची बांधणी ९७२ ऐवजी जवळपास ७६४ तासांत करावी लागणार आहे. श्रमिक तास कमी आणि जुनाट यंत्रसामग्रीमुळे बसबांधणीसाठी कामगारांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. यातून कामाचा भार वाढणार असून, दररोज तीनऐवजी चार बसची पुनर्बांधणी करावी लागेल, असे कामगारांचे म्हणणे आहे.आधुनिक यंत्रांमुळे कामे सोपी होतात; परंतु कार्यशाळेत अनेक जुन्या यंत्रांनीच बसबांधणीचे काम करावे लागत आहे. ड्रील मशीन, टीन कटर अशी काही यंत्रे अनेक वर्षांपूर्वीची आहेत. यातील काही यंत्रांचे भाग मिळतदेखील नाहीत. त्यामुळे ती बंद आहेत. या सगळ्याचा परिणाम बसच्या निर्मिती क्षमतेवर होतो. अनेक यंत्रे ही दापोडी कार्यशाळेत वापरलेली आहेत. नव्या प्रकारातील बसच्या बांधणीसाठी काही यंत्रे प्राप्त झाल्याचेही कामगारांनी म्हटले.
जुनाट यंत्रांनीच बांधा एसटी बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 1:05 AM