औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची आर्थिक अडवणूक करणाऱ्या सुलभ शौचालयचालकास एका प्रवाशाने चांगलाच धडा शिकविला. नियमाप्रमाणे पैसे न घेता अतिरिक्त पैसे उकळत असल्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून या जागृत प्रवाशाने थेट स्टिंग आॅपरेशनच केले. त्यामुळे महामंडळास सुलभ शौचालयात होणाऱ्या या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी लागली.मध्यवर्ती बसस्थानकातील सुलभ शौचालयात प्रवाशांची सर्रास आर्थिक लूट केली जाते. प्रवाशांकडून वारंवार तक्रार करूनही ही आर्थिक लूट काही केल्या थांबलेली नाही. मोफत सुविधा असताना महिलांकडून पैसे आकारले जातात. शिवाय पुरुषांकडूनही अवाच्या सवा रक्कम आकारली जाते. शौचालयाच्या वापरासाठी २ रुपये आणि आंघोळीसाठी ३ रुपये दर आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून पुरुषांकडूनही अवाच्या सवा रक्कम आकारली जाते. परंतु शनिवारी मात्र एका प्रवाशाने सुलभ शौचालय चालकास जेरीस आणले. शौचालयाचा वापर केल्यानंतर पाच रुपयांची मागणी करण्यात आली. प्रवाशाने पाच रुपये दिले. परंतु त्यासाठी २ रुपये नमूद केलेले असल्याचे प्रवाशाच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने या प्रकाराचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. त्यानंतर चित्रीकरणासह अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या तक्रारीवरून शौचालयचालकास एक हजार रुपयांचा दंड लावण्यात आला, अशी माहिती स्थानकप्रमुख विजय बोरसे यांनी दिली.
एस.टी. प्रवाशानेच केले सुलभ शौचालयाचे स्टिंग
By admin | Published: August 24, 2016 12:29 AM