संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावात एसटी महामंडळाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. परिणामी, कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नसल्याची स्थिती वारंवार उद्भवत आहे. त्यात कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिलेही थकली आहेत. वैद्यकीय खर्चासाठी काहींनी नातेवाइकांकडून उसने पैसे घेतले आहेत, तर कोणी कर्ज घेतले. खासगी रुग्णालयांची महागडी बिले भरताना कर्मचारी मेटाकुटीला येत आहेत.
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही वैद्यकीय उपचाराचा खर्च आधी स्वत:च्या खिशातून करावा लागत असल्याची स्थिती आहे. नंतर एसटी महामंडळाकडून त्याची नियमानुसार रक्कम दिली जाते; परंतु कोरोनामुळे एसटीची आर्थिक स्थिती बिघडली आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीच निधी नसल्याने दोन-दोन महिने पगार होत नाहीत. यात गेल्या दीड वर्षांपासून वैद्यकीय बिले मिळत नसल्याचीही स्थिती आहे. कर्मचाऱ्यांना डाॅक्टरांच्या कागदपत्रांसह वैद्यकीय बिले कार्यालयास सादर करावी लागतात. त्याची पडताळणी केली जाते. बिल विभागीय पातळीवरील असेल त्याची मंजुरी विभागीय पातळीवरच मिळते, अन्यथा ते मुंबईला पाठविले जाते.
--
जिल्ह्यातील एकूण आगार- ८
- अधिकारी-४२
- कर्मचारी-७५८
-बसचालक- १२००
- वाहक-९००
--
पगार दोन महिन्यांतून एकदा
कोरोनाकाळात गेल्या १७ महिन्यांत वारंवार वेतन विलंबाला सामोरे जावे लागत आहे. त्यातही जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे वेतन सप्टेंबरच्या प्रारंभी मिळाले. दोन महिन्यांतून एकदा पगार होत असल्याची स्थिती आहे. वेतनाअभावी कोणाचे घरभाडे थकते, तर कोणाकडे किराणा दुकानदारांची थकबाकी वाढते. या सगळ्याला सामोरे जात एसटी कर्मचारी सेवा देत आहेत.
---
वैद्यकीय बिले दीड वर्षे मिळेनात
कोरोनामुळे एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती बिघडली आहे. वैद्यकीय बिलांचा परतावा देण्यासाठी निधीच उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती आहे. दीड वर्षे होत आहे. तरी अनेक कर्मचाऱ्यांना बिलाचा परवाना मिळत नसल्याचे कर्मचारी संघटनेतर्फे सांगण्यात आले.
-----
उपचारावर झालेला खर्च कोठून आणायचा
बिले लवकर द्यावीत
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून वैद्यकीय बिले मिळत नसल्याची स्थिती आहे. पूर्वी महिना, दोन महिन्यांत बिले मिळत होती. आता कर्मचाऱ्यांना खिशातून वैद्यकीय खर्च करावा लागत आहे. किमान वैद्यकीय बिले लवकरात लवकर देण्यात यावीत.
- मकरंद कुलकर्णी, विभागीय सचिव, महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन
---
वारंवार फोन करावे लागतात
एक लाखापेक्षा अधिक बिल असले तरी ते मुंबईतून मंजूर केले जाते; परंतु सध्या कर्मचारी संख्या आणि निधी अपुरा आहे. त्यामुळे बिले मंजूर होण्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात येते. बिलासाठी वारंवार फोन करून विचारणा करावी लागत आहे.
- एक कर्मचारी
--------
निधीच्या उपलब्धतेनुसार बिले
वैद्यकीय बिल सादर केल्यानंतर निधीच्या उपलब्धतेनुसार ते मंजूर करून कर्मचाऱ्यांना देण्यात येते. अधिक रकमेचे वैद्यकीय बिल असेल तर मुंबईला पाठविले जाते. अशा बिलांना लाँग बिल म्हटले जाते. बायपास, ॲन्जिओप्लास्टी यासारख्या आजारांसाठी ॲडव्हान्स दिला जातो.
- अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ